सोलापूर : सोलापूर शहरातील पिण्याचे पाणी व कचरा संकलनाचे नियोजन बिघडले आहे. जुळे सोलापूरला सहा दिवसात पाणीपुरवठा तर आठवड्यातून एकदा कचरा संकलनासाठी घंटागाडी येत आहे. माजी नगरसेवकांनी अधिकाऱ्याविरोधात यल्गार पुकारला आहे तर हिवाळी अधिवेशनातही पाणीपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सोलापूर शहराला पाणीपुरवठा सुधारण्यासाठी थेट उजनी धरणातून टाकण्यात येणाऱ्या दुहेरी जलावाहिनीचे काम प्रगतीपथावर आहे. पण अद्याप सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुधारलेला नाही. स्मार्ट सिटी एरियात दररोज व इतर भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देणाऱ्या मनपा प्रशासनाला अद्याप पाणी प्रश्न सोडवता आलेला नाही. भर पावसाळ्यात उजनी धरण 100% भरलेले असतानाही पाण्याची बोंब झालीच. आता हिवाळा सुरू झाला असून कडाक्याची थंडी पडत आहे. पाण्याची मागणी कमी असतानाही मनपा पाणीपुरवठा विभागाला सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन जमलेले नाही. पावसाळ्यात पाच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता हिवाळ्यात सहा दिवसाआडवर गेला आहे. फेब्रुवारीनंतर उन्हाळ्याचा कडाका वाढल्यानंतर पाण्याचे नियोजन आणखी बिघडणार अशी चिन्हे दिसत आहेत. गावठाण भागातले पाणी नियोजन बिघडल्यामुळे मनपाचे माजी पक्षनेते सुरेश पाटील यांनी पाणी देता येत नाही तर अधिकाऱ्यांनी खुर्च्या खाली कराव्यात अशी मागणी केली आहे.
प्रश्न हिवाळी अधिवेशनात
महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडला. आ. देवेंद्र कोठे म्हणाले, उजनी धरण सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी असूनही सोलापूरला आठवड्यातून केवळ एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महापालिका प्रशासन पाणीपुरवठा करण्यात कमी पडत आहे. सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी टाकण्यात येत असलेल्या दुहेरी जलवाहिनीच्या ११० किमी च्या कामापैकी १०६ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. केवळ ४ किमीचे काम राहिले आहे. दुहेरी जलवाहिनी कार्यान्वयित झाल्यानंतर सोलापूर शहराला रोज किंवा किमान एक दिवसाआड पाणी मिळेल, असे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. परंतु महापालिकेने अद्याप जलशुद्धीकरण केंद्राची जागाच ताब्यात घेतलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग तसेच अन्य कारणांमुळे हे काम थांबल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. शासनाकडून सोलापूर महानगरपालिकेला हे काम पूर्ण करून घेण्याबरोबरच नियमित पाणीपुरवठा करण्यासंदर्भात सूचना द्याव्यात आणि सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत केली आहे.
कचरा संकलनातही अडचणी
हद्दवाढ भागातील कचरा संकलनात ही मोठ्या अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. अधिकारी कचरा संकलनासाठी दररोज घंटा गाड्या फिरतात असे सांगतात. पण प्रत्यक्षात जुळे सोलापुरात कचरा संकलनासाठी घंटागाडी आठवड्यातून एकदा येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे घरात साठलेला कचरा नागरिक रस्त्यावर फेकून देताना दिसून येत असून पुन्हा कचरा कोंडोळे साठण्यास सुरुवात झाली आहे. मनपाने रस्ते सफाई सुरू केली आहे. यामुळे रस्ते स्वच्छ झाले असले तरी घंटागाड्याचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे. घंटागाड्याद्वारे कचरा संकलनासाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्या की अधिकारी ठेकेदारांना दमबाजी करताना दिसतात. पण कचरा संकलनातील अनेक घंटागाड्यांमध्ये दोष असल्याचे सांगण्यात येत आहे. गाड्या बंद असल्याने एका गाडीवर मोठी जबाबदारी देण्यात येत असल्याने नेमून दिलेल्या वेळापत्रकानुसार गाड्या फिरण्यात अडचणी येत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ऐन सोलापूरच्या यात्रे वेळेस पाणी वितरण व कचरा संकलन यातील नियोजन बिघडल्याचे दिसून येत आहे.