सोलापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५९ व्या प्रदेश अधिवेशनाच्या मंडपाचे भूमिपूजन मंगळवारी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर करण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळीच्या शालेय समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन आणि यश डेव्हलपर्सच्या संचालिका सोनाली खानापुरे यांच्याहस्ते खांबाचे पूजन करून, नारळ फोडून मंडपाचे पूजन झाले. २३, २४, २५ रोजी हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर हे अधिवेशन होत आहे.
याप्रसंगी सोनाली खानापुरे म्हणाल्या, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संघटना विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना आहे. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न नियमितपणे सोडवून अभाविप विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार देते. पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सोलापुरात होणारे अधिवेशन भव्य होणार असून या अधिवेशनातून विविध शैक्षणिक विषयांवर होणारे चिंतन आगामी काळातील शिक्षणाची दिशा ठरवणारे असेल असेही सोनाली खानापुरे यांनी याप्रसंगी सांगितले. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळीच्या शालेय समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांनीही अधिवेशनाला मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी छत्रपती श्री शिवाजी महाराज मंडळाचे अध्यक्ष आणि अभाविप प्रदेश अधिवेशनाचे संरक्षक रंगनाथ बंकापूर, स्वागत समिती सचिव सुहास जोशी, कोषाध्यक्ष संतोष कुलकर्णी, व्यवस्था प्रमुख चन्नवीर बंकुर, प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य ॲड. मल्लिनाथ शहाबादे, प्रा. अवधूत काटीकर, प्रा. धन्यकुमार बिराजदार, ॲड. अमोल कळके, सहसचिव चेतन शर्मा, अधिसभा सदस्य यतिराज होनमाने तसेच कार्यकर्ते आणि पूर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभाविपचे प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के यांनी प्रास्ताविक केले. अनघा जाधव यांनी सूत्रसंचालन तर रजनी गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.