March 10, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर मिनी मंत्रालयाची चावी महिलांच्या हाती; “सोलापूर समाचार’ चे वृत्त तंतोतंत खरे ठरणार

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेत महिलाराज येणार हे वृत्त यापूर्वीच “सोलापूर समाचार’ने प्रसिद्ध केले आहे. त्याप्रमाणे भाजपने अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापती पदी महिला पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचे नियोजन केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची 18 मार्च रोजी निवड होणार आहे. यासाठी भाजपच्या गटनेत्याची निवड भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी मंगळवारी जाहीर केली आहे. गटनेतेपदी रश्मी बागल (करमाळा), उपनेतेपदी प्रदीप खांडेकर (मंगळवेढा), प्रवक्ता नेताजी खंडागळे दक्षिण सोलापूर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यसभा खासदाराच्या निवडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूरच्या ज्योती वाघमारे यांची निवड करून राज्याला धक्का दिला आहे. त्यामुळे साहजिकच सोलापूरच्या राजकारणात भाजपलाही वेगळे करून दाखविण्याची संधी आहे. त्यामुळे भाजपने झेडपीत महिलाराज आणण्याची योजना आखली असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी निवडण्याचे अधिकार पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिले आहेत. पालकमंत्री गोरे यांनी मिनी मंत्रालयाच्या राजकारणात धक्कातंत्र देण्याची संपूर्ण तयारी केल्याचे सांगण्यात येत आहे. पहिला धक्का गटनेतेपदी रश्मी बागल यांच्या निवडीचा आहे. त्यानंतर आता 18 मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत महिलांचीच नावे पुढे येणार असे सांगितले जात आहे. अध्यक्षपदासाठी बार्शीच्या दराडे यांचे नाव निश्चित झाले असून उपाध्यक्षपदी शांभवी कल्याणशेट्टी यांची निवड निश्चित मानले जात आहे. त्यानंतर समाजकल्याण सभापती पदावर सातपुते आणि महिला बालकल्याण सभापती पदावर दुर्गा अंकुशराव, कृषी सभापती पदासाठी खताळ यांच्या नावाची चर्चा आहे.