सोलापुरात आज दिसणार संचारबंदीसारखी स्थिती..!

सोलापूर : सोलापुरातील रस्त्यावर सोमवारी दुपारी शुकशुकाट दिसणार आहे. सोलापुरात असं घडलं तरी काय? काय म्हणता… सोलापुरातील मंडळी गावाकडे जाणार आहेत. होय, वेळा अमावस्यानिमित्त गाव शिवार माणसांनी फुलणार आहे.
सोलापुरात रस्त्यावर दररोज जाणवणारी वर्दळ आज कमी दिसणार आहे. निमित्त आहे वेळा आमावश्या सणाचे. वेळा अमावस्यानिमित्त आज गावशिवार फुललेली दिसून येत आहेत. शहरातील बरीच मंडळी पांडव पूजेसाठी आपल्या शेतावर व मित्रांच्या फार्महाऊसवर गर्दी केल्याचे दिसून येत आहे. दर्शवेळा अमावस्या शेतकऱ्यांच्या जीवनातील मोठा सण आहे. कर्नाटक सीमावृत्ती प्रांत व सोलापूर जिल्ह्यात हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आज शेतकरी सहकुटुंब शेतावर जाऊन पांडवपूजा करून ‘खज्जी-भजीचा” चा आस्वाद घेताना दिसून येतो. त्यामुळे शिवारात ‘चांगभलं.. चांगभलं… असा आवाज घुमणार आहे. यंदा ज्वारीचे पीक जोमात आल्याने शेतकऱ्यांच्या आनंदाला भरते आले आहे. त्यामुळे मित्रमंडळीसह भोजनाचा कार्यक्रम शिवारात मोठ्या जोमाने सुरू आहे. त्यामुळे शहरातील बरीच मंडळी आज शेतावर जाताना दिसून येत आहेत. त्यामुळे सकाळपासूनच गावाकडे जाणारे रस्ते वाहनांच्या गर्दीने फुललेले दिसून येत आहेत.
कलेक्टरनी जाहीर केली सुट्टी…
यंदा प्रथमच वेळा आमावश्याला कलेक्टरनी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे शाळकरी मुलांनाही या सणाचा आनंद घेता येणार आहे. सरकारी नोकरदार हे मोठ्या प्रमाणावर आपल्या व मित्रांच्या शेतावर जाण्याची तयारी करताना दिसून येत आहेत. शेतकऱ्यांच्या घरात पहाटेपासूनच या सणाच्या तयारी सुरू असताना दिसून येत आहे. या सणामुळे बाजारपेठ रविवारी फुलली होती. या दिवशी गाव शिवारातील सर्व देवतांना नैवेद्य व नारळ चढविला जातो. त्यामुळे नारळांच्या किमतीत दुपटीने वाढ दिसून आली. शेतातील मध्यभागी असलेल्या शमी किंवा इतर झाडांच्याखाली पांडवपूजा मांडली जाते. दगडावर का व चुन्याचा वापर करून पांडवाच्या पाच प्रतिमा काढल्या जातात. त्या शेजारी कुंभाराकडून आणलेले गाडगे ठेवले जाते. पांडवाच्या प्रतिकृतीवर शेतात आलेले पिकाने छत उभारले जाते. त्यानंतर सहकुटुंब पांडव पूजा करून भोजनाचा आस्वाद घेतला जातो. गावातील शिवारा शिवारात आजही मेजवानी झडणार असल्याने सोलापुरात आज दुपारनंतर संचारबंदीसारखी स्थिती दिसून येणार आहे.
काय आहे इतिहास…
वेळ अमावास्या (किंवा वेळा अमावास्या, मराठी ग्रामीण भाषेत येळवस) हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्रमध्ये सोलापूर,नांदेड धाराशिव,लातूर, परळीचा उर्वरित भाग येथे साजरा होणारा कृषिप्रधान उत्सव आहे. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो.भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्त्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो.
अशी होते तयारी….
वेळामवस्याच्या आदल्या दिवशी रात्री भाकरी करतात. भाकरीला त्या दिवशी भाकर न म्हणता ‘रोडगा’ म्हणतात. त्याचबरोबर भाज्यांची मोकळी भजी, खीर,आंबील, सजगुरऱ्याचे (बाजरीचे) व ज्वारीचे उंडे, तिळाच्या भाकरी, भजी, शेंगदाण्याचे लाडू हे नैवेद्याचे पदार्थ करून ठेवतात. आदल्याच दिवशी सगळा भाजीपाला आणि ‘आळंदे’ खरेदी केले जाते. ‘आळंदे’ म्हणजे एक लहान बिंदगी (लहान मडके) आणि त्यावर झाकायला एक येळणी (खापराची प्लेट). या ‘आळंद्यात सकाळी घरातील एका माणसाने आंबील भरून शेतात घेऊन जायचे असा रिवाज आहे.
वर्षाच्या सर्व उत्सवांमध्ये वेळामावास्या हा एकमेव उत्सव असा आहे की, या उत्सवासाठीचा स्वयंपाक हा आदल्या दिवशी करतात जातो आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर आनंदाने खातात. काहीजण तर आंबील आणि तत्सम पदार्थ शेतातच ठेवून दोनदोन दिवस त्यावर ताव मारतात. त्यामुळे तुम्ही शेतकरी नसाल व तुम्हाला या सणाविषयी माहिती नसेल तर लगेच तुमच्या शेतकरी मित्राला फोन करा व त्याच्या शेतावर आज तात्काळ हजर व्हा आणि या सणाचा आनंद घ्या.