पालकमंत्र्याअभावी अडली सोलापूरची डीपीसी

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अद्याप कोणाचीही नियुक्ती न केल्यामुळे जिल्हा नियोजन समितीची सभा रखडली आहे.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालेले नाही. सोलापूरकरांमधून स्थानिक पालकमंत्री हवा अशी मागणी होत होती. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीला पूर्णविराम दिला आहे. फडणवीस सरकारने डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन उरकले. अधिवेशनानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या घोषणा होतील अशी अपेक्षा होती. डिसेंबर अखेर सोलापूर जिल्हा नियोजन समितीची सभा होणे अपेक्षित होते. जिल्हा प्रशासनाने तशी तयारीही केली आहे. मार्च अखेर खर्च होणाऱ्या विकास कामांना प्राधान्याने मंजुरी देण्यासाठी जिल्हा नियोजनची सभा वेळेत होणे अपेक्षित आहे. पण जिल्ह्याचे पालकमंत्री नेमले नसल्याने ही सभा झालीच नाही. आता नवीन वर्षातील पहिला आठवडा संपत आला तरी अद्याप फडणवीस सरकारने पालकमंत्र्यांची घोषणा केलेली नाही.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ग्रामविकास मंत्री गोरे व पुण्याचा मिसाळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. गोरे यांनी सांगलीला पसंती दिल्यामुळे मिसाळ यात सोलापूरच्या पालकमंत्री होतील असे सांगण्यात येत होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला पालकमंत्री होण्याचा मान मिसाळ यांना मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण पुन्हा गोरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री कोणी का होईना पण सोलापूर जिल्ह्याच्या प्रश्नांना न्याय मिळावा अशी अपेक्षा राजकीय वर्तुळातून होऊ लागली आहे.