
सोलापूर : प्रत्येक पालकांना धक्का देणारी घटना सोलापुरात घडली आहे. मोबाईल गेमच्या आहारी गेलेल्या एका शाळकरी मुलाने काचेने गळा कापून घेऊन आत्महत्या केल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.
सिव्हिल पोलीस चौकीत नोंद असलेल्या डायरीनुसार प्रचित भगवान मुंडे ( वय :17, रा.: समर्थ नगर विजापूर रोड सोलापूर ) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विजापूर नाका पोलिसांना माहिती मिळाल्यावर 16 जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता वेदांत टॉवरच्या शौचालयाच्या दरवाजा बंद करून आतील खिडकीचे काच तोडून त्याने काचेने गळ्याला गंभीर इजा करून घेतल्याचे दिसून आले. यामुळे तो शौचालयात निपचित पडून होता. त्यामुळे हवालदार जाधव यांनी त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मरण पावल्याचे डॉ. ओंकार यांनी जाहीर केले.
याबाबत हवलदार जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत प्रचित हा सीईटी परीक्षेच्या तयारीसाठी जुळे सोलापुरात एका खाजगी क्लासला जात होता. गुरुवारी तो नेहमीप्रमाणे क्लासला गेला पण उशिरापर्यंत न आल्यामुळे पालकांनी शोध घेतला. त्यावेळी क्लासच्या खालच्या मजल्यावरील शौचालयात आतून कडी दिसली. संशयामुळे दरवाजा तोडून पाहिल्यावर त्याने आतून कडी लावून घेऊन काचेने गळा कापून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. त्याचे वडील महापालिकेच्या शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम करतात. मुलाला परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्यांनी खाजगी क्लास लावला होता. गेले काही दिवस तो तणावात होता असे पालकाने सांगितल्याचे हवालदार जाधव यांनी सांगितले. त्याच्या या कृत्याने पालकांना धक्का बसल्यामुळे ज्यादा चौकशी करू शकलो नसल्याचे त्याने स्पष्ट केले. तपासात पुढील बाब स्पष्ट होईल असे ते म्हणाले.
पण या घटनेमुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे. इतर शिक्षक व पालकाच्या चर्चेमधून मिळालेल्या माहितीनुसार तो मोबाईल गेम खेळायचा. पालकाने मोबाईल दूर केल्यावर यातूनच त्याने हे कृत्य केले असावे अशी चर्चा आहे.त्यामुळे पालकांनो सावधान. अनेक पालक घरी लहान मुलगा किरकिर करतो म्हणून त्याला मोबाईलवरचे व्हिडिओ लावून देताना दिसून येतात. तर अनेक शाळकरी मुले मोबाईल गेम खेळताना आढळतात. अलीकडे रील बघण्याचे फ्याड मुलांमध्ये वाढत चालले आहे. यातून मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन ती एकलकोंडी बनत चालल्याचे दिसून येत आहे. यातून डोळे, मेंदूच्या अनेक समस्या उद्भवताना दिसून येत आहेत. मोबाईलच्या वापराचे हे दुष्परिणाम दिसून येत असतानाही अनेक पालकांचा याकडे कानाडोळा होत असल्याचे जाणवत आहे. अशा गंभीर घटना होण्याआधीच पालकांनी वेळेत जागरूक होण्याची गरज असल्याचे मत जाणकारांमधून व्यक्त होत आहे.