ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे घेणार सोलापूर झेडपीचा आढावा

सोलापूर : ग्राम विकासमंत्री जयकुमार गोरे हे सोमवार दि. 20 जानेवारी रोजी सोलापूर जिल्हा परिषदेचा कामकाजाचा आढावा घेणार आहेत.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सोमवारी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुणे भेटीत त्यांनी विभागातील जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा ठेवला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामकाजाची माहिती या बैठकीत घेतली जाणार असल्यामुळे शनिवार दिनांक 18 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेला सुट्टी असतानाही मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे व त्यांच्याबरोबर काही विभाग प्रमुख जिल्हा परिषदेत हजर होते. बैठकीच्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांची तयारी करण्यात येत होती. त्यामुळे शनिवारी सुट्टीचा दिवस असतानाही जिल्हा परिषद गजबजलेली दिसून आली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पहिल्यांदाच जिल्हा परिषद यांच्या आढाव्याने कामकाजास सुरुवात केली आहे. सोलापूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांचे नाव चर्चेत आहे. प्रजासत्ताक दिनी त्यांच्याचहस्ते ध्वजारोहण होणार असे सांगितले जात आहे. त्यामुळे 25 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा होण्याची शक्यता आहे.