सोलापूर : दक्षिण सोलापुरातील मंद्रूप गावामध्ये मागील दीड महिन्यापासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ८ चोरटे कैद झाले असून अद्याप पोलिसांना त्यांचा ठावठिकाण लागलेला नाही. पोलिसांनी गस्त वाढविली असून तरीही चोरटे हातसफाई करताना दिसून येत आहेत.

मंद्रूप गावातील मुख्य बाजारपेठेत दीड महिन्यापूर्वी चोरट्यांनी घरफोड्या केल्या. एका दुकानासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा या चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. चोरटे हातात हत्यारे घेऊन गल्लीबोळात फिरताना दिसून आले आहेत. या प्रकारानंतर किराणा दुकानातील साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. त्यानंतर आता शेतातील वस्तीवर समोरील शेळ्या, जनावरे चोरीला जात आहेत. चोरट्यांच्या दहशतीमुळे  युवकांसह, ज्येष्ठ नागरीक रात्रभर गस्त घालत आहेत. पोलिसांची वाहन गस्त सुरु असून मोटार सायकल व पायदळ तपासणीचे गस्ती पथकं केवळ कागदावरच असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. क्वचितप्रसंगी मध्यरात्री गावातील मुख्य रस्त्यावरून भरधाव वेगात गस्त पथकाची गाडी जाते. पण, चोरांच्या दहशतीने गस्त घालणाऱ्या गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा देण्याची तसदी मंद्रूप पोलिस घेत नसल्याचे सांगितले जात आहे. याउलट पोलिसांचे सत्कार सोहळे सुरू असल्याबाबत नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

२८ डिसेंबरला गावात चार ते पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या. त्यानंतर वाड्या वस्त्यांवर चोरट्यांचा वावर सुरुच आहे. पंधरा दिवसांपूर्वी गावातील नवले गल्लीतील एका बंद घरामध्ये दोन संशयित व्यक्ती बसलेल्या दिसून आल्या होेत्या. लोकांनी त्या बंद घराच्या बाहेर पहारे देत पोलिसांना बोलाविले. पण पोलीस पथक वेळेवर न आल्याने अंधाराचा फायदा घेत संशयित पसार झाल्याचे प्रत्यक्ष घटना दर्शीने सांगितले. त्यानंतर वीरभद्र मंदिर परिसरात मध्यरात्री पोलिसमित्र प्रकाश जकुणे यांनी एका संशयीतास पकडले. त्याबरोबर संशयीताच्या दुसऱ्या साथीराने पोलिसमित्राला मारहाण करीत अंधाराचा फायदा घेत पळून गेले. त्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढले असून दररोज चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सायंकाळ नंतर शेतातून दूध घालण्यास येणाऱ्या युवकांची अडचण झाली आहे. सायंकाळनंतर मुलांना घराबाहेर पाठविणे पालकांना असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे पोलिसांनी गस्त अधिक कडक करावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *