
सोलापूर : पाणी सोडण्यासाठी येत असलेले सर्व अडथळे दूर करून लघु पाटबंधारे विभागाच्या रामपूर तलावाअंतर्गत असलेल्या रामपूर, कर्देहळ्ळी आणि तोगराळी हद्दीतील कालव्याला अखेर 14 वर्षांनी पाणी सोडल्याने तिन्ही गावांतील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, यासाठी शेतकर्यांच्या पाठपुराव्यानंतर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता एस.एस. खांडेकर यांची संवेदनशीलता आणि त्यांच्या सहकार्यांनी दाखविलेली तत्परता कामी आली.
रामपूर तलावातून शेतीपिकांसाठी कालव्याला पाणी सोडा, जमत नसेल तर कालव्यासाठी संपादित केलेल्या आमच्या जमिनी आम्हाला परत करा, दोन्हीपैकी एकाही मागणीची पूर्तता होत नसेल तर शिवजयंतीदिवशी रामपूर तलावात सामूहिक जलसमाधी घेऊ, असा आक्रमक इशारा लाभधारक शेतकर्यांनी दिल्यानंतर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता खांडेकर यांनी तातडीने सर्व अडथळे दूर करून येत्या आठ दिवसांत पाणी सोडण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन शेतकर्यांना देऊन तसे आदेश पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पी.एम.बाबा व सहायक अभियंता अभियंता आर. एम. वाकचौरे यांना दिले होते. त्यानुसार कार्यकारी अभियंता मो.ता. जाधवर व उपअभियंता बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता वाकचौरे व कालवा निरीक्षक सिध्देश्वर नागणसुरे, राजेंद्र गायकवाड, अप्पाराव पवार, पंडित राजमाने यांनी पाणी सोडण्यासाठी असलेले अडथळे 24 तासांत दूर करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांना उपसरपंच अशोक माने, राम माने, गणेश माने, रोहित सावंत, रितेश जाधव, मलकारसिध्द शिंदीबंदे या लाभधारक शेतकर्यांचे सहकार्य लाभले.
गेल्या 50 वर्षांतील एक-दोन वेळेचे अपवाद वगळता आजतागायत या कालव्याला पाणी आले नाही. सततच्या दुष्काळामुळे तलावात पाणीसाठा होत नसल्याने बाधित शेतकर्यांच्या दोन पिढ्या पाण्याच्या प्रतीक्षेत गेल्या. परंतु पाणी काही मिळाले नाही. दरम्यान, आता उजनी धरणातून एकरुख उपसा सिंचन योजनेद्वारे तलावात पाणी आले आहे. त्यामुळे कालव्याला पाणी सोडण्याची मागणी लाभधारक शेतकर्यांतून करण्यात येत होती. परंतु, पाणी सोडण्यासाठी तांत्रिक अडचणी येत असल्याचे कारण सांगून पाणी सोडणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले होते.
त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी सोमवारी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता खांडेकर यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली होती. अधीक्षक अभियंता खांडेकर यांनी हा विषय गांभीर्याने घेत सहकारी अधिकारी व लाभधारक शेतकर्यांशी चर्चा करून आठ दिवसांत पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, दोनच दिवसात सर्व अडथळे दूर करून बुधवारी पाणी सोडल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यातून अधीक्षक अभियंता खांडेकर यांची शेतकर्यांविषयी असलेली संवेदनशीलता दिसून आली.