सोलापूरजिल्हा परिषद

जलजीवनमुळे नळाला पाणी, लोंढेमोहितेवाडीतील महिलामध्ये समाधान

सोलापूर : पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा योजना नादुरूस्त असल्यामुळे लोंढेमोहितेवाडी ( ता.माळशिरस ) येथील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळण्यास अडचण होती पण आज जल जीवन मिशन ही योजना यशस्वीपणे मार्गी लागली आहे.त्यामुळे गावातील प्रत्येक कुटूंबाना पुरेसे व शुध्द पाणी पुरवठा होत आहे.पर्यायाने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची विशेषत: महिलांची पायपीट थांबल्याने ग्रामस्थ व महिलांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुक्यात तालुक्यापासून साधारणतः २४ कि.मी. अंतरावर सातारा जिल्हयातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र असलेल्या शिखर शिंगणापूर या धार्मिक ठिकाणच्या शेजारी लोंढेमोहितेवाडी हे गाव आहे.या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये निवडलेले सरपंच व ७ सदस्य तसेच सचिव ग्रामसेवक यांच्या सहकार्यातून ग्रामपंचायतीचे प्रशासन चालविले जाते.या गावची लोकसंख्या १४४६ असून २४० इतकी कुटूंब संख्या असलेले एक छोटस गाव आहे.गावात निवडणूक झाल्यानंतर गावचे पदाधिकारी व ग्रामस्थ गावातील निवडणूक, राजकारण विसरून गावामधील विकासकामे करण्यासाठी एकजूटीने एकत्र येतात हे या गावाचे विशेष आहे.

गावात पूर्वी ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी जलस्वराज्य या योजनेमधून पाणी पुरवठा योजना करण्यात आलेली होती. पण ही योजना नादुरूस्त असल्यामुळे योजना पूर्णपणे बंद अवस्थेत होती.त्यामुळे गावातील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळण्यास अडचण होती.पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना गावात व परिसरात असणा-या हातपंप व विहिरीमधून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत असे.ग्रामस्थांच्या या मुख्य अडचणींचा विचार करून लोंढेमोहितेवाडी या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.अंजना विजयसिंह लोंढे, ग्रामसेवक दत्तात्रय गोरे यांनी ग्रामपंचायतीध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ यांची बैठक बोलावली आणि या बैठकीमध्ये गावच्या पिण्याच्या पाण्याची अडचण दूर कशी करायची ? याबाबत निर्णय घेऊन गावात पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार गावातील प्रत्येक कुटूंबाला पिण्यासाठी शुध्द व पुरेसा नळाद्वारे पाणी पुरवठा करणे अत्यंत गरजेचे होते म्हणून जल जीवन मिशन या योजनेमधून गावात पाणी पुरवठा योजना राबविण्याचे ठरले.त्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग माळशिरस यांच्या सहकार्याने पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव दाखल करून जिल्हा परिषद स्तरावरून जल जीवन मिशन ही योजना मंजूर करण्यात आली.या जल जीवन मिशन योजनेंतर्गत सन २०२२-२३ मध्ये पाणी पुरवठा योजनेसाठी विहीर खोलीकरण, पंपींग मशिनरी, उर्ध्वनलिका, वितरण व्यवस्था व नळ कनेक्शन आदी कामे करण्यात आली आहेत.या पाणी पुरवठा योजनेचे काम २९ ऑगस्ट २०२२ रोजी सुरू केल्यानंतर एका वर्षामध्ये म्हणजे २९ ऑगस्ट २०२३ रोजी काम पूर्ण करण्यात आले आहे. या कामांसाठी ६३ लाख ४४ हजार रुपये इतका तर नळ नोडणी या कामासाठी २ लाख ६१ हजार ६१३ रुपये इतका निधी खर्च झालेला आहे.आज या लोंढेमोहितेवाडी गावाला पाणी पुरवठा विहीरीवरून विद्युत पंपाद्वारे पाण्याच्या टाकीमध्ये पाणी भरले जाते आणि टाकीमधून घरोघरी नळ जोडणी करून प्रत्येक कुटुंबांना प्रती माणसी ५५ लिटर याप्रमाणे पाणी पुरवठा केला जातो.
आज या गावातील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी त्रास सहन करावा लागला पण ग्रामस्थ व पदाधिकारी यांची एकजूट व जलजीवन मिशन या योजनेमुळे महिलांची त्रासापासून मुक्तता झाली आहे.त्यामुळे आज गावातील महिलांच्या चेह-यावर समाधान दिसून येत आहे.म्हणून गावचे सरपंच, उपसरपंच,सदस्य व ग्रामस्थ हे खूप आनंदी आहेत.आज या गावचा पिण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागााचे कार्यकारी अभियंता संजय धनशेटटी, पंचायत समिती, माळशिरस, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, माळशिरस यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य मानसिंग मोहिते, माजी सरपंच सदशिव ननवरे, माजी उपसरपंच मोहन जाधव, सुवर्णा मोहिते, उपसरपंच ज्ञानेश्वर बोधले, सदस्य विशाल सोनमळे, शितल मोहिते, उज्ज्वला पोतेकर, पुष्पा लोंढे,रुपाली ननवरे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

लोंढेमोहितेवाडी गावात पाणी पुरवठा योजना नादुरूस्त असल्यामुळे गावातील महिला व ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी तारांबळ उडत होती पण आज जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या सहकार्यामुळे जल जीवन मिशन या योजनेची चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी झाल्यामुळे सर्व ग्रामस्थांना पिण्यासाठी पुरेसे व शुध्द पाणी पुरवठा होत आहे.
– सौ.अंजना विजयसिंह लोंढे, सरपंच, लोंढेमोहितेवाडी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button