December 5, 2025

Solapur Samachar

Latest Marathi News

अपघातात मरण पावलेल्या पोलिसाच्या वारसाला 70 लाखाची भरपाई

सोलापूर : मोहोळ – कामती रस्त्यावरील नजीकपिंपरी येथे ट्रक अपघातात मरण पावलेल्या सोलापूर ग्रामीण वाहतूक शाखेतील पोलीस संजय खटके यांच्या वारसाला 70 लाखाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश लोक अदालतीमध्ये पॅनल प्रमुख जिल्हा न्यायाधीश वाय. ए. राणे व सदस्य लक्ष्मण मारडकर यांनी दिला.

मंद्रूप- मोहोळ बायपासवरील नजीकपिंपरी येथे 15 जानेवारी 2016 रोजी हा अपघात झाला होता. सोलापूर ग्रामीण वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल संजय खटके यांना दहा चाकी ट्रकने धडक दिली होती. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर त्यांची पत्नी उषा खटके, मुलगा सुरज, निरंजन व आई-वडिलांनी इपको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीविरुद्ध 39 लाख 44 हजार 760 रुपयाची भरपाई मिळावी म्हणून दावा दाखल केला होता. यात विमा कंपनीने तडजोडीचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे हे प्रकरण 22 मार्च रोजी झालेल्या जिल्हा लोक अदालतीमध्येमध्ये ठेवण्यात आले होते. वारस व विमा कंपनीच्या प्रतिनिधीमध्ये चर्चा होऊन 70 लाखाच्या भरपाईची तडजोड मंजूर करण्यात आली. यात अर्जदारातर्फे ऍड.विद्यावंत पांढरे तर विमा कंपनीतर्फे ऍड. जी. एच. कुलकर्णी यांनी काम पाहिले.