सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी झेडपीच्या इतिहासात शुक्रवारी मोठा दणका दिला आहे. सोलापूर शहरालगत असलेल्या कुंभारी ग्रामपंचायतचा कारभार 28 वर्षापासून पाहणाऱ्या ग्रामविकास अधिकारी सहदेव ढेपे यांच्यासह इतर अनेक ग्रामसेवकांना दणका दिला आहे. बारा वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या ग्रामपंचायत व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पदभार घेतल्यापासून आपल्या कार्याची चुणूक दाखविण्यास सुरुवात केली आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे 31 मे अखेर सर्व विभागाच्या प्रशासकीय बदल्या करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाने यापूर्वीच केले होते. त्यानुसार सर्व विभागांच्या बदल्या घेण्यात आल्या होत्या. यावेळी सीईओ जंगम स्वतः हजर राहून कर्मचाऱ्यांना समुपदेशाने आवडीच्या ठिकाणी नियुक्ती दिली होती. त्यानंतर ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे आरोग्य व ग्रामपंचायत विभागातील प्रशासकीय व विनंती बदल्यांचा कार्यक्रम घेण्यात आला. यात दिनांक 30 व 31 मे रोजी बदल्याचे नियोजन करण्यात आले.
30 मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेच्या सहभागृहात स्वतः उपस्थित राहून प्रशासकीय व विनंती बदल्या केल्या. ग्रामपंचायत विभागातील सुमारे 71 ग्राम विकास अधिकारी तथा ग्रामसेवकांच्या बदल्या करण्यात आल्या. यात मातब्बर असलेल्या कुंभारी ग्रामपंचायतमध्ये सहदेव ढेपे हे नियुक्तीपासून तेथेच काम करीत होते. पदोन्नती मिळाल्यानंतरही त्यांनी तेथेच नियुक्ती मिळवली आणि यापेक्षा विशेष धक्कादायक बाब म्हणजे त्यांचे वडीलही ग्रामसेवक म्हणून याच ग्रामपंचायतीत निवृत्त झाले आहेत. सीईओ कुलदीप जंगम यांनी त्यांची बदली केली आहे. त्यांच्याजागी ग्रामसेवक प्रेम पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंद्रूपचे ग्रामसेवक नागेश जोडमटे यांची गतवर्षीच्या बदल्यामध्ये निम्बर्गी येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी पुजारी यांना नियुक्त करण्यात आले होते. पण काही काळातच त्यांनी पदभार सोडला. त्यामुळे मंद्रूप ग्रामपंचायतचा अतिरिक्त पदभार पुन्हा नागेश जोडमोटे यांच्याकडे देण्यात आला होता. मंद्रूप ग्रामपंचायतला ग्रामसेवक मिळावा म्हणून सदस्य नितीन रणखांबे झेडपीत ठाण मांडून बसले होते. अखेर मंद्रूप ग्रामपंचायतला मोहोळ तालुक्यातील कुशाबा इंगळे हे ग्रामसेवक मिळाले आहेत. सांगोला तालुक्यातील इंगोले यांची अशाच प्रकारे बदली झाली आहे. माळशिरस तालुक्यातही ठाण मांडून बसलेल्या ग्रामसेवकांना दुसरीकडे जावे लागले आहे. ग्रामसेवकांच्या बदल्या करताना विनंतीसाठी मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुके लॉक करण्यात आले होते. पण रिक्त असलेल्या जागी नव्याने ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या आहेत. यात आरोग्यसेवकापासून औषध निर्माण अधिकाऱ्यांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बारा वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन ठिकाण मिळाले असून या बदल्यांमुळे आरोग्य केंद्राच्या कामकाजात सुधारणा होणार असल्याची चर्चा सर्व कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या कालावधीत एकाच ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आता मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बदली.. बदली… एकच चर्चा
ग्रामपंचायत व आरोग्य विभागातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेत आज गर्दी केली होती. जिल्हा परिषदेचे पार्किंग व मोकळी जागा कर्मचाऱ्यांनी भरून गेली होती. सगळीकडे बदली, बदली असाच गोंगाट सुरू होता. प्रशासकीय बदली कोठे होणार याबाबत कर्मचाऱ्यांनाही उत्सुकता व भीती वाटत होती. सीईओ जंगम हे सकाळी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आले आणि प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी बदलीची प्रक्रिया सुरू केली. यावेळी सीईओ जंगम यांनी कर्मचाऱ्यांची यादी काटेकोरपणे तपासून बदल्या केल्या. बदल्यांचे आदेश देताना त्यांनी कोणाचाही मुलाहिजा बाळगला नाही. या बदल्यांबाबत सकाळी “सोलापूर समाचार’ मध्ये आरोग्य विभागाबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबतही त्यांनी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्याकडून यादीची खातरजमा करून घेतली. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी करताना आरोग्य विभागाची धावपळ उडाली.
आरोग्यमधील बदल्यांची यादी…




आरोग्य विभागातील हिरवे या नावाच्या कर्मचाऱ्याशी बदल झाली काय