March 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर झेडपीत सीईओकडे जाणाऱ्या फायली होतात गायब!

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जाणाऱ्या फायली गायब होत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. अशा फायली कोण गायब करतं? हे प्रशासनाला माहित असूनही याबाबत मौन साधले जात आहे. अशा अनेक प्रकारातूनच अक्कलकोटला बदली झालेले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक सुधाकर माने- देशमुख यांना कार्यमुक्त करावे, अशा मागणीला आता जोर धरला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या आदेशानुसार 30 व 31 मे रोजी ग्रामपंचायत, आरोग्य आणि पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय बदल्या करण्यात येणार आहेत. केवळ हे तीनच विभाग नव्हे तर इतर सर्व विभागातीलही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी होत आहे. बदल्यातून सुटका करून घेण्यासाठी अनेक जण कर्मचारी संघटनांच्या पदांचा आधार घेत असल्याचे दिसून आले आहे. नर्सेस संघटनेच्या जगताप यांनी याबाबत थेट आरोप केला आहे. आरोग्य कर्मचारी संघटनेचे महेश जाधव यांचा पंढरपूर पंचायत समितीमधील कालावधी जास्त झालेला असतानाही कमी दाखवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असे अनेक कर्मचाऱ्यांच्याबाबतीत घडले आहे. बदलीतून सुटका करून घेण्यासाठी नियमाचा आधार घेत असे अनेक जण झेडपीच्या सीईओंच्या आदेशाला फसवीत असल्याचे दिसून आले आहे.

अशा अनेक प्रकारातूनच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे स्वीय सहाय्यक असलेले सुधाकर माने- देशमुख यांच्यावर आता आरोप होत आहे. वास्तविक सीईओकडे नदाफ व तलवार हे चांगल्या पद्धतीने कार्यालयीन कामकाज करीत आहेत. नदाफ यांच्यावर ही जबाबदारी दिली तर उलट सीईओचा कार्यकाल चांगला जाईल, अशी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे. तत्कालीन सीईओ आव्हाळे यांच्या कालावधीत देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. त्यांची नियुक्तीच वादग्रस्त ठरली होती. त्यावेळी देशमुख यांनी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दिला होता. त्यामुळे आव्हाळे यांनी थोडे दिवस कामकाज पाहू असे म्हणून वेळ ढकलली. पुढे देशमुख यांच्या स्वेच्छा निवृत्तीचे काय झाले? हे कोणालाच कळले नाही. त्यानंतर सीईओ म्हणून जंगम यांनी पदभार घेतला. या काळात अनेक गंभीर बाबी त्यांच्यासमोर आल्या. पण त्याला पांघरून घालण्यात आले. सीईओ जंगम यांनी ई-फायलिंग सिस्टीमला महत्त्व दिले आहे. पण तरीही चक्क सीईओ यांच्या केबिनमधूनच फायली गायब होत असलेल्या तक्रारी आल्या आहेत. मग या फायली कोणी गायब केल्या? याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे. सीईओ कार्यालयातील महत्त्वाची माहिती बाहेर जाते. नेहमीच्या चांडाळ चौकडीबरोबर सार्वजनिक ठिकाणी कोण बसतो. अशा बैठकांमधून तर ही माहिती बाहेर जात नाही ना? अशी शंका कर्मचाऱ्यातून घेतली जात आहे. माध्यमिक शिक्षण विभाग वादातीत ठरला आहे. या विभागाला नवे कर्मचारी कोण देऊ देत नाही. या विभागात काम करणाऱ्या वादग्रस्त कर्मचाऱ्यांना वरदहस्त कोणाचा? हाही विषय संशोधनाचा झाला आहे. वादग्रस्त कर्मचाऱ्यांशी लांगेबांदे कोणाचे आहेत, वरिष्ठांच्या नावाने “लक्ष्मी’ दर्शनाचा आधार घेणाऱ्याचा सीईओ जंगम यांनी शोध घेतला नाही तर भविष्यात अडचणी वाढणार आहेत, असे कर्मचाऱ्यांमध्ये खुलेपणाने बोलले जात आहे. तरीही याकडे प्रशासनाचे लक्ष नाही, ही बाब गंभीर म्हणावी लागेल. सीईओ कुलदीप जंगम यांनी आपल्या  कार्याची झलक दाखवत पाच वर्षापासून अधिक कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. मुख्यालय ठाण मांडून बसलेल्या अशा कर्मचाऱ्यांना तालुक्यात काम करावयास पाठवावे अशी मागणी होत आहे. या मोहिमेची सुरुवात त्यांनी स्वतःच्या स्वीय सहाय्यकापासून करावी याही चर्चेला जोर धरला आहे.

काय आहेत पीएचे कर्तव्य…

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पीएचे कर्तव्य व जबाबदारी काय? याबाबत आता मोठा आक्षेप घेतला जात आहे. जिल्हा परिषदेला पंचायतराज अभियानात राजपाल व ग्रामविकास मंत्र्यांच्याहस्ते पुरस्कार मिळाला. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे हे मोठे फळ असतानाही याचा जल्लोष करता आला नाही. झेडपीत असे पहिल्यांदा घडले आहे. सुदैवाने सध्या प्रशासक कारभार सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकाने सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेचे चांगले नाव होईल, असे काम करणे अभिप्रेत आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा विकासात्मक दौरा, निर्णय याची माहिती दिली जात नाही. त्यामुळे साहजिकच जिल्हा परिषदेच्या कामकाजाविषयी सामान्य लोकांमध्ये निगेटिव मत तयार होत आहे. आगामी काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. पदाधिकारी आल्यानंतर हा समन्वय कायम राहील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.