सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या. तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी महाडिबीटी वेबसाईटवर कृषी योजनांसाठी अर्ज केला आहेत का? असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. सोलापूर जिल्ह्यातील सात हजार शेतकऱ्यांना महाडीबीटीची लॉटरी लागली आहे.
कृषी विभागामार्फत महाडीबीटी वेब पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जातो. यासाठी शेतकऱ्यांनी या ॲपवर आपला सातबारा, आठ अ डाउनलोड करून संबंधित योजनेसाठी आपली मागणी नोंदवणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अशी नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच कृषी विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. राज्यात एकाच वेळी कृषी योजनांची ही लॉटरी काढण्यात आली आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील ७ हजार २५४ शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी दिली आहे. पण महत्त्वाचे म्हणजे यातील फक्त ८५७ शेतकऱ्यांनीच कागदपत्रे अपलोड केली आहेत. इतर शेतकऱ्यांनी या वेबसाईटवर जाऊन आपले नाव लॉटरीच्या यादीत आहे का हे तपासून कृषी विभागाच्या सूचनेनुसार संबंधित कागदपत्रे लोड करणे आवश्यक आहे. कृषी विभागाकडे संबंधित शेतकऱ्यांची यादी आली असून कृषी सहाय्यकानमार्फत कागदपत्रे व संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या बाबी पूर्ण करून घेतल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांनी ज्या योजनेसाठी अर्ज केला आहे त्या योजनेतील साहित्य खरेदी किंवा बांधणीबाबत मंजुरी पत्र दिले जाणार आहे.
लॉटरी लागलेल्या शेतकऱ्यांमध्ये १ हजार ७०९ शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज केले आहेत. यामध्ये ट्रॅक्टर खरेदी, पावर टिलर, मळणी यंत्राचा समावेश होत आहे. त्यामुळे ज्यांचे लॉटरीत नाव आले आहे अशा शेतकऱ्यांनी आता या यंत्राची खरेदी करून सर्व ती कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे. लॉटरीत आलेल्या ३ हजार १२४ शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज केला आहे. ८९४ शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी मंजुरी मिळाली आहे. १२०० शेतकऱ्यांनी अस्तरीकरण योजनेसाठी अर्ज केला होता, त्यांनाही मंजुरी मिळाली आहे. अशाप्रकारे महाडीबीटी पोर्टलवर कृषी योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. यातून या शेतकऱ्यांना 42 कोटी अनुदान वाटप होणार आहे. सोलापूर जिल्ह्याला मिळालेल्या या अनुदानाचे शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हा कृषी अधीक्षक भोसले यांनी केले आहे.

More Stories
सोलापूरच्या वाहन मालकाकडून 35 हजाराची लाच घेताना पुण्याचा फौजदार अटकेत
युरोपमधील “पॅरिसमहल’ मध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली शिवजयंती
सोलापूर महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाला पहिल्याच सभेत नामुष्की