April 23, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी ; पिस्टल गँगकडून वाहन व जबरी चोरीचे आठ गुन्हे उघड

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी रेकॉर्डवरील सराईत अंतरजिल्हा ३ गुन्हेगार जेरबंद केले असून त्यांच्याकडून ४ जबरीचोरीचे व ३ वाहन चोरी आणि १ आर्म अॅक्ट असे ८ गुन्हे उघडकीस आणून २ देशी बनावटीचे पिस्टल, ३ जिवंत काडतूसे, ५८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यासह २ कार, ३ मोटारसायकल, ३ मोबाईल फोन असा एकूण १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास करणा-या लोकांना अडवून लुटमार करून वाहने हिसकावून घेण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने हे गुन्हे उघडकीस आणून प्रतिबंध करण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळे पथके तयार करून जिल्हयातील मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथक कार्यालयात हजर असतना पोलीस शिपाई  सागर ढोरे-पाटील व अक्षय डोंगरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, चैतन्य शेळके (रा. भोत्रा) व करण भोसले (रा. खांडवी ता. बार्शी) हे दोघे आपल्याजवळ देशी बनावटीचे गावठी पिस्टल व जिवंत काडतूसे बाळगून बार्शी तालुका हद्दीतील चोरलेल्या चारचाकी क्रमांक MH 14 GA 4210 वाहनाने बार्शी येथून सोलापूरकडे येणार आहेत. त्याप्रमाणे सपोनि नागनाथ खुणे यांनी त्यांच्या पथकासह सोलापूर- बार्शी  रस्त्यावर कारंबा गावच्या पुढे काही अंतरावर दस्त घालत गेले असता खोबऱ्याने दिलेल्या माहितीतील कार रोडच्याकडेला एका झाडाखाली उभी करण्यात आलेली दिसली. संशय आल्याने वाहनातील इसमांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे विचारपूस केल्यावर पुढील नावे कळाली.  चैतन्य उर्फ भैव्या पांडूरंग शेळके (वय २३ वर्षे रा. भोत्रा, ता. परांडा जि. धाराशिव), करण शिवाजी भोसले (वय २२ वर्षे, रा. खांडवी ता. बार्शी जि. सोलापूर). या दोघांची अंगझडती घेतली असता, त्यांच्या कब्जात दोन देशी बनावटीचे पिस्टल व तीन जिवंत काडतूसे मिळून आली.सोबत असलेल्या चारचाकी वाहनाबाबत विचारपूस करता करण शिवाजी भोसले यांने सांगितले की, त्याचा आणखीन एक साथीदार असून या दोघांनी मिळून कुर्दूवाडी ते बार्शी रोडवर रात्रीच्यावेळी या चारचाकी वाहन चालकास पिस्टलचा धाक दाखवून दमदाटी करून चोरून आणल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी चैतन्य शेळके यांनी आपल्या जवळील  सोन्याचे लॉकेट आवाटी येथील बाळूमामा मंदीराजवळ बसलेल्या एका इसमाच्या गळयातील असल्याचे सांगितले. इतर साथिदारास बोलावून घेवून त्यास पिस्टलचा धाक दाखवून दमदाटी करून बळजबरीने हे लॉकेट काढून घेतल्याचे सांगितले. आरोपीने पिस्टल  मारूती नागनाथ माने (रा. सुकटा ता. भुम जि. धाराशिव) याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितल्यावर त्यालाही अटक करण्यात आली आहे.

आरोपी चैतन्य उर्फ भैव्या पांडुरंग शेळके व करण शिवाजी भोसले यांनी तुळजापूर, सोलापूर तालुका, बार्शी, करमाळा, वैराग, कामती, कुर्डुवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्हे केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.