February 21, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

अक्कलकोटमधील बदलत्या राजकारणामुळे “हा’ मित्र वणव्यातच

सोलापूर :

“दुःख अडवायला उंबऱ्यासारखा

मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा

वाट चुकणार नाही जीवनभर तुझी’

अनंत राऊतांचे हे गीत सध्या मराठी माणसांच्या ओठावर आहे. मैत्रीचा संबंध जिथे येतो तिथे आवर्जून या गीताचा उल्लेख होतो. अक्कलकोटचे बदलते राजकारण सध्या राज्यभर चर्चेत आहे. नुकतेच माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. याच दरम्यान त्यांचे जवळचे मित्र मल्लिकार्जुन पाटील यांनी मात्र काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. तसे पाहिले तर पाटील हे नेहमी म्हेत्रे यांच्याबरोबर असायचे. म्हेत्रे शिवसेनेत गेले म्हणून पाटील यांची मैत्री तुटली, असे झालेले नाही. पाटील सध्या बालपणाचे मित्र “दादा’कडे गेल्यामुळे अडचणीत आले आहेत. त्याला तसं कारणही वेगळं आहे. राजकारण कसेही असो पण मित्र दुरावल्याची खंत त्यांना लागून राहिली आहे.

अक्कलकोटमध्ये भाजपकडून सचिन कल्याणशेट्टी दुसऱ्यांदा निवडून आले. त्यामुळे काँग्रेस गोटात असलेली कार्यकर्ते मंडळी कामे होत नाहीत म्हणून मोठ्या प्रमाणावर दादांकडे आकर्षित झाली. माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचीही अशीच अडचण होत गेली. मागील निवडणुकीपासून कोणता झेंडा हाती घ्यावा या विवंचनेत असलेले म्हेत्रे यांनी शेवटी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. पण त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची मोठी पंचायत झाली. कोणता निर्णय घ्यावा याबाबत ते बुचकाळ्यात राहिले. अशीच परिस्थिती मेहत्रे यांच्यासोबत नेहमी दिसणारे जेऊरच्या मल्लिकार्जुन पाटील यांची झाली. अखेर त्यांनी काँग्रेस सोबतच राहण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय घेतला असला तरी जवळचे मित्र दूर गेल्यामुळे ते दुःखी असल्याचे दिसून आले.

गेल्या आठवड्यात माध्यमिक शाळेचे काम होत नाही म्हणून ते तावातवाने झेडपीत आले होते. पण जे काम आडलं होतं त्याची माहिती घेतल्यावर मित्रांनीच त्यांची अडचण निर्माण केल्याचे दिसून आले. पण या मित्राबाबत त्यांनी ब्र शब्द काढला नाही. माझे मित्र कोठेही असोत पण सुखी असोत असे भावनिक उदगार त्यांनी काढले. मैत्री अशी करा जिवापर्यंत मित्रांनी साथ दिली पाहिजे. लहानपणापासून मी एका ताटात जेवलो. जिल्हा परिषदेत सभापती झालो. तरीही ते मित्र माझ्यासोबत होते. पण राज्यात सत्तापालट झाल्यानंतर त्या मित्रांनी साथ सोडली याचे मला वाईट वाटत आहे, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.  वडिलांचे मित्र म्हणून त्यांनी आपल्या शिक्षण संस्थात त्यांच्या मुलांना संधी दिली. त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत पद रिक्त ठेवून एक वर्ष वाट पाहिली. ती मुले म्हणजे मल्लिकार्जुन पाटील यांचे बालपणापासूनचे मित्र. संस्थेत नोकरीला असतानाही त्यांनी त्यांना कधी तशी वागणूक दिली नाही. राजकारणाच्या निमित्ताने ते कोठेही फिरत असले तरी त्यांच्यासोबत ते सावलीसारखे असत. पण आता अक्कलकोटमधील बदलत्या राजकारणामुळे त्या मित्रांनी साथ सोडली. त्यातील एका मित्राने कर्नाटक सरकारच्या आर्थिक साह्याने अक्कलकोटच्या सीमेवर शाळा काढण्यासाठी 25 लाखाचे अनुदान घेतले होते. पण प्रत्यक्षात शाळा काढलीच नाही. हे लक्षात आल्यावर कर्नाटक सरकारने अनुदान परत मागितले. त्यातील 13 लाखाच्या वसुलीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पाटील यांच्या संस्थेच्या नावे पत्र काढले आहे. त्यामुळे त्यांच्या पगारीतून या अनुदानाची वसुली देण्यासाठी ते माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याकडे हेलपाटे घालत आहेत.