सोलापूर : आजचा दिवस हा सोलापूरकरांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. सोलापूर विमानतळ येथून सोलापूर ते गोवा ही विमान सेवा सुरू होत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा हा देशाच्या हवाई क्षेत्राशी जोडला गेला आहे. यातून सोलापूर जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. तसेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू केली जाणार असल्याची ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
विमानतळ प्राधिकरण परिसरात आयोजित सोलापूर ते गोवा विमान सेवा उद्घाटन समारंभ प्रसंगी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मोहोळ मार्गदर्शन करत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार रणजीतसिंह मोहिते- पाटील, आमदार देवेंद्र कोठे, आमदार उत्तम जानकर, आमदार अभिजित पाटील, आमदार राजू खरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम तसेच माजी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, माजी आमदार राजेंद्र राऊत, राम सातपुते, फ्लाय नाईन्टी वन कंपनीचे सीईओ दिनेश चाको यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मोहोळ पुढे म्हणाले की सोलापूर हे दक्षिण पश्चिम भागाला जोडणारा केंद्रबिंदू आहे, त्याचबरोबर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठिकाण असून येथून सुरू झालेली विमानसेवा ही सोलापूर सह या भागाच्या विकासातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. कर्नाटक व तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील जिल्ह्यांनाही याचा लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले. विमान कंपन्या एखाद्या शहरातून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या त्यांना लाभ मिळू शकेल का याचा विचार अगोदर करतात. त्यानंतरच विमानसेवा सुरू केली जाते आजपासून गोव्याला विमानसेवा सुरू झालेली आहेच, परंतु ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसाठी ही विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अथक प्रयत्नातून गोव्यासाठी विमानसेवा सुरू झाली आहे, त्याप्रमाणेच मुंबईसाठी ही लवकरच ही सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती मोहोळ यांनी यावेळी दिली.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विमानसेवा शुभारंभाचा आजचा हा दिवस सोलापूरसाठी आनंदाचा दिवस असल्याचे सांगून सोलापूरच्या उद्योग, व्यवसाय व पर्यटन वाढीसाठी महत्वपूर्ण आहे. पहिल्या टप्प्यात गोवा येथे सेवा सुरू होत असून गोवा येथून देश व विदेशात सर्व ठिकाणी विमानाने प्रवास करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच मुंबईची विमान सेवा सुरू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. ही विमान सेवा सुरू करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विकास मंच यांनी केलेल्या पाठपुराव्याचे पालकमंत्री यांनी कौतुक केले.
सोलापूर विमानतळ प्राधिकरणचे संचालक चंद्रेश वंजारा यांनी आपल्या प्रास्ताविकात सोलापूर विमान तळासाठी करण्यात आलेल्या विविध कामांची माहिती दिली. यावेळी सोलापूर येथील पाच प्रवाशांना केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात बोर्डिंग पास देण्यात आले.
झेंडा दाखवून विमान सेवेचा शुभारंभ
सोलापूर विमानतळ प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच फ्लाय 91 कंपनीच्या विमानाला केंद्रीय वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी झेंडा दाखवून आजपासून सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा शुभारंभ केला. यावेळी सर्व लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. आता पुढचे विमान शुक्रवारी येणार आहे.

More Stories
रेड कार्पेट; सोलापूर झेडपी अध्यक्ष निवडीची जय्यत तयारी
सांगोल्यात दहावीच्या भूगोलच्या पेपरची चोरी; तरीपण ठरल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची परीक्षा होणार
अखेर.. सोलापूर झेडपीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष ठरले