सोलापूर : आयएएस होण्याआधी मी पाच वर्षे पोलीस विभागात सेवा केली. पंतप्रधान दौऱ्याचा व्हीव्हीआयपी पोलीस बंदोबस्त केला. पण या पोलीस बंदोबस्तापेक्षा पंढरपुरातील आषाढी वारीच्या सुविधाचे नियोजन करून प्रत्यक्ष वारीचा अनुभव घेतला. पदभार घेतल्यापासून आषाढी वारीचे नियोजन हा शब्द कानावर पडत होता पण प्रत्यक्ष वारी काय असते हे काम केल्यावरच कळाले. पंढरपुरातील आषाढी वारीचा अनुभव हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
आषाढी वारीचा सोहळा पार पडल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे कामकाजातून निवांत झाले आहेत. बुधवारी त्यांनी जिल्हा परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. गोपाळकाला झाल्यानंतर वारीचे कामकाज संपणार आहे. पण संतांचे पालखी सोहळे जिल्ह्यात प्रवेश केल्यापासून ते आषाढी एकादशीच्या सोहळ्यापर्यंत जिल्हा प्रशासनावर जबाबदारीचे मोठे टेन्शन असते. यंदा आषाढी वारीसाठी 25 लाखांची गर्दी होणार असा अंदाज बांधून प्रशासन तयारीला लागले होते. पालखी मार्गावरील सुविधा अशी मोठी जबाबदारी जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर आहे. आय एस जंगम म्हणाले आषाढी वारी हा माझ्या जीवनातील पहिलाच अनुभव होता. त्यामुळे नियोजनाबाबत विभाग प्रमुखांची सतत बैठका घेतल्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी समन्वय साधून सर्व सूचनांचे पालन करीत जिल्हा परिषदेचे यंत्रणा कामाला लावली. गतवर्षी पालखी मार्गावर काय व्यवस्था होते याचा अंदाज घेऊन यंदा काय वेगळे करता येईल याबाबत नियोजन केले. पावसाला अगोदरच सुरुवात झाल्यामुळे यावेळेस वारकऱ्यांच्या सुविधांसाठी जर्मन हँगर चा प्रयोग करण्यात आला. पालख्या ज्या ठिकाणी मुक्कामाला येत आहेत त्या ठिकाणी अगोदर बारा तास यंत्रणा कामाला लागत होती. वारकऱ्यांची संवाद साधून ही यंत्रणा 36 तास अगोदर कामाला लावली. त्यामुळे अडचणी कमी झाल्या. सोहळा पार पडल्यानंतर अस्वितेच्या कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत. फक्त रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाण्याचे टँकर थांबून राहत होते. ड्रोनची निगराणी असल्यामुळे ही चूक लक्षात आली त्याबाबत संबंधित कंत्राटदारांना तंबी देण्यात आली आहे. पाण्याचे टँकर, ॲम्बुलन्स यांच्या नियंत्रणासाठी ड्रोनची निगराणी खूप कामाला आली. स्वच्छता ग्रहाच्या अडचणी येऊ नयेत म्हणून वारीचा अनुभव असलेल्या व इतर जिल्ह्यात बदलून गेलेले पाच अधिकारी मतीसाठी घेण्यात आले होते याचाही मोठा फायदा झाला. स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी यवतपासून यंत्रणेवर लक्ष ठेवले. तिथे आढळलेल्या त्रुटी त्यांनी अगोदरच कळविल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर स्वच्छतागृहाच्या अडचणी भासू दिल्या नाहीत. चार्जिंग स्टेशन व फूट मसाजरचा प्रयोग चांगला झाला.
मॉडेल पालखीतळ करणार
पालखीतळावर कायमस्वरूपी सोयी सुविधा करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे त्यातून दरवर्षी एक मॉडेल पालखीतळ तयार करण्यात येईल अशी माहिती सीईओ जंगम यांनी दिली. दरवर्षीच्या आषाढी वारी बाबत कोणत्याही विभागाकडे एसओपी नाही. यावर लक्ष केंद्रित करून काम करण्यात येत आहे. पालखी मार्ग शेजारील झेडपीच्या मालकीचे सोळा रस्त्यांचे काम चांगल्या प्रकारे झाले आहे. सर्वांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडली आहे त्यामुळे आषाढीवारी सोहळा यशस्वी करण्याचे संपूर्ण श्रेय टीमवर्कला आहे असे जंगम यांनी नमूद केले. पालखी सोहळा गेल्यानंतर लगेच साफसफाई केली जात होते त्यामुळे स्वच्छतेचे मोठे काम झाले आहे. आषाढी वारी सोहळ्यासाठी सर्व सुविधांसाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला मुख्यमंत्री कार्यालयाने स्वतः वारकऱ्यांच्या सुविधेच्या नियोजनाकडे लक्ष दिले.
अर्धे पुण्य झेडपीला
आषाढी वारीच्या काळात दहा दिवस पंढरपूर ते पालखी मार्ग असाच आपला प्रवास राहिला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याबरोबर माझा समन्वय होता. त्यामुळे कोठेही जायचे असेल तर आम्ही दोघांनी दौरा केला. लोकांशी संवाद साधल्यावर त्यांच्या माफक अपेक्षा होत्या. शासन इतक्या प्रमाणावर पालखी मार्गावर सुविधा देत आहे. त्यामुळे वारीला पुन्हा येऊ अशी पहिली वारी करणाऱ्या तरुणांनी प्रतिक्रिया दिली आहे. चरणसेवा उपक्रमात फूट मसाजरचा चांगला उपयोग झाला चालून थकल्यावर मालिश करणाऱ्यांना अर्धे पुण्य जात होते ते आता झेडपीच्या उपक्रमामुळे आम्हालाच मिळाले अशा प्रतिक्रिया आल्या. त्यावर मी त्या वारकऱ्यांना उत्तर दिले आता अर्धे पुण्य झेडपी ला द्या. ज्या कर्मचाऱ्यांनी यासाठी काम केले त्यांचे योगदान मोठे आहे ग्रामसेवकांची यात मोठी भूमिका आहे. त्यामुळे आषाढी वारी चांगली सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्याचा मनोदय असल्याचेही सीईओ जंगम यांनी सांगितले.

More Stories
‘स्टॉप कॅन्सर’ कार्यशाळेत महिलांना मिळाले कॅन्सर प्रतिबंधासाठी ज्ञान
ट्रेनिंग सेंटरमध्ये बेकायदा बदली; त्या बदल्यात घर बांधून घेतले
सोलापूर मिनी मंत्रालयाची चावी महिलांच्या हाती; “सोलापूर समाचार’ चे वृत्त तंतोतंत खरे ठरणार