सोलापूरआरोग्यजिल्हा परिषद

ग्रामीण भागातील गरोदर महिलांना मोफत सोनोग्राफी सुविधा

सोलापूर : जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आरोग्य समितीची सभा झाली.ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

सभेमध्ये मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी, रिक्त पदे, उपलब्ध सुविधा तसेच सेवा अधिक सक्षम करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.आषाढी वारीदरम्यान आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांना उत्कृष्ट आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे सभापतींनी विशेष कौतुक केले. त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदनाचा ठरावही सभेत मंजूर करण्यात आला.

यावेळी आरोग्य विभागाच्या विविध योजना नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच प्रत्येक आरोग्य उपकेंद्र नियमितपणे कार्यरत राहून नागरिकांना दर्जेदार सेवा मिळाली पाहिजे, अशी ठाम भूमिका सभापतींसह सर्व सदस्यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील प्रत्येक गर्भवती महिलेला वेळेत सोनोग्राफी सेवा मिळावी यासाठी संबंधित परिसरातील उपलब्ध सोनोग्राफी केंद्रांशी समन्वय (टाय-अप) करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना सभापतींनी दिल्या.

याप्रसंगी आरोग्य समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव भालके, जिल्हा परिषद सदस्य सविताताई कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य सोनालीताई कडते, जिल्हा परिषद सदस्य करुणाताई शिवशरण, प्रशांत कडते, जनार्दन शिवशरण, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड तसेच सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी इ आदी मान्यवर तसेच सर्व जिल्हा आरोग्य विभाग अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button