सोलापूर : वाखरी रिंगण सोहळा पार पडला अन् काही क्षणात वारकऱ्यांची गर्दी पांगापांग झाली पण बाजीराव विहिरीजवळ एक वयस्कर महिला जागेवरच बसून होती,तिला उठता येत नव्हते. हेल्प, हेल्प म्हणून तिने मदत मागितली आणि आम्ही तात्काळ तिच्याकडे धाव घेतली. पायी चालून शुगर जास्त झाल्यामुळे तिला उठता येत नव्हते. लागलीच ॲम्बुलन्स बोलवून आम्ही तिला पुढील उपचारासाठी हलवले. तिच्यासोबत कोणीच नव्हते. इतकी शुगर आहे तर माऊली वारीला आलात कशाला? असा सवाल केल्यावर ती महिला म्हणाली माझ्यासाठी सरकारने सोय केली आहे ना! त्यामुळे वारी कशाला चुकवायची, असा पालखी सोहळ्याबरोबर आलेला अनुभव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी कथन केला.
आषाढी वारी सोहळा यशस्वी केल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना यांचा जिल्हा परिषद पत्रकार संघातर्फे अध्यक्ष शेखर गोतसुर्वे यांनी सन्मान केला. यावेळी संवाद साधताना डॉ. नवले यांनी वारीमध्ये आलेले अनुभव कथन केले. यंदा वारीला वारकऱ्यांची मोठी गर्दी होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी मार्गावर आरोग्य यंत्रणा वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज होते. गतवर्षी आषाढी वारी काळात तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिर घेण्यात आले होते. पण यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोग्य मंत्री आबिटकर, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आरोग्य यंत्रणेचे वेगळे नियोजन केले होते. पालखी मार्गावर 158 ठिकाणी प्रथमोपचार केंद्र तर नऊ ठिकाणी तंबू उपचार केंद्राची सोय केली होती. तीन किलोमीटर अंतरावर एक उपचार केंद्र कार्यरत होते. 102 च्या 44 तर 108 च्या 21 ॲम्बुलन्स कार्यरत होत्या. मोटरसायकल वरून 121 आरोग्य दुतांची सेवा कार्यरत होती. यंदा प्रथमच 21 ठिकाणी आयसीओची यंत्रणा उभी केली होती. आपत्कालीन स्थितीत या आयसीयुचा मोठा फायदा झाला. महाआरोग्य शिबिरापेक्षा मायक्रो प्लॅनिंग प्रभावी दिसून आले. अत्यवस्थ भाविक रुग्ण गर्दीतून उपजिल्हा केंद्राकडे हलविणे अवघड जात होते. अशा गरजू रुग्णाला जागेवरच उपचार मिळाले. या यंत्रणेसाठी बाहेरील जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टर आले होते. आरोग्य सेवेसाठी 5000 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला, यामध्ये 1000 डॉक्टर होते. एकात्मिक सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी गरजू रुग्णाला तात्काळ मदत मिळाली हे या वेळचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल असे डॉ. संतोष नवले यांनी सांगितले. मुख्यमंत्री आरोग्य रथाचाही वारकऱ्यांना मोठा फायदा झाला. माऊलीच्या पालखी सोहळ्याबरोबर तीन तर श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्या बरोबर दोन मुख्यमंत्री आरोग्य रथ ठेवण्यात आले होते. इतक्या मोठ्या यंत्रणेसाठी जिल्हा आरोग्य विभागातर्फे कोठेही औषधाची कमतरता भासू देण्यात आली नाही. शुद्ध पाणी व स्वच्छतागृहाची चांगली सुविधा उपलब्ध करण्यात आल्यामुळे भाविकांना आरोग्याचा कोणताच त्रास झालेला दिसून आलेला नाही. जवळपास दहा लाख वारकऱ्यांनी आरोग्य सुविधेचा लाभ घेतला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांची ही तिसरी वारी ठरली आहे. मागील कामाचा अनुभव लक्षात घेऊन वारकऱ्यांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशा मिळतील यावर त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले. वाखरी येथील रिंगण सोहळा संपल्यानंतर बाजीराव विहिरीजवळ एक महिला बसून होते. पाय गळाल्यामुळे तिला उठता येत नव्हते. तिने मदतीची हाक दिल्यानंतर आम्ही तेथे धाव घेतली. शुगर वाढल्यामुळे तिचे पाय गळाले होते. तात्काळ ॲम्बुलन्स बोलवून तिला उपचारासाठी हलविण्यात आले. तिच्याजवळ कोणीही नव्हते. फक्त एक पर्स व बॅग घेऊन ती वारीला मुंबईहून आली होती. माऊली इतकी शुगर असेल तर कोणालातरी सोबत घेऊन यायचे, असे म्हटल्यावर ती म्हणाली, माझ्यासारख्या वारकऱ्यांसाठी सरकार आहे ना… वारीमध्ये इतक्या आरोग्य सुविधा मिळतात, हा विश्वास घेऊन वारकरी सोहळ्यात सहभागी होत असल्याचा हा अनुभव मला मनाला आनंद देणारा ठरला, असे डॉ. संतोष नवले म्हणाले.
यावेळेस वेगळेपण दिसले…

- जिल्हा आरोग्य विभागात माध्यम अधिकारी म्हणून काम पाहिलेले रफिक शेख म्हणाले गेल्या 27 वर्षापासून मी आरोग्य विभागाच्या सेवेसाठी आषाढी वारीचे काम करतोय. या वेळचा अनुभव वेगळाच ठरला. वारीला मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. पालखी मार्गावर सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्यामुळे आबालवृद्ध मोठ्या विश्वासाने वारीत सहभागी होत असल्याचे दिसून आले. पायी चालून दमलेल्या वारकऱ्यांना औषधोपचाराबरोबरच चरणसेवा फायद्याची ठरली. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे काम मोठे असल्यामुळे कोठेही साथीच्या आजाराचा प्रभाव दिसून आला नाही.

More Stories
माढा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फलोत्पादन मंत्री गोगावले यांच्याकडून पाहणी
सोलापुरात रमजान ईद उत्साहाने साजरी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सोलापुरात आध्यात्मिक मानवंदना