March 5, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

Wari: वारकऱ्यांना शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी पंधरा दिवसापासून सुरू होते तपासणी

सोलापूर : पालखी सोहळ्याबरोबर मार्गावरून येणाऱ्या वारकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पंधरा दिवस आधीपासून तीनवेळा पाणी स्तोत्रांची टेस्ट केली जाते, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी दिली.

आषाढीवारी सोहळा काळात पंढरपूरकडे येणाऱ्या मानाच्या पालख्यांसोबत असलेल्या वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे आहे. वारकऱ्यांची गर्दी असताना व रस्त्यावर मोठे ट्रॅफिक असताना पाण्याचे टँकर वाहतूक करून वारकऱ्यांना येण्याचे शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पडल्याबद्दल कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांचा सोलापूर जिल्हा परिषद बीट पत्रकार संघातर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना कार्यकारी अभियंता धनशेट्टी यांनी वारकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी तयारी कशी केली जाते, याची माहिती दिली. जिल्हा प्रशासनाकडून आषाढी वारीचे नियोजन सुरू झाले की पहिला विषय सुरू होतो तो वारकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठ्याचा. मानाच्या दोन्ही पालखी सोहळ्यासाठी यंदा 234 टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यासाठी टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी 112 फिडिंग सेंटर व देखरेख ठेवण्यासाठी 142 कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये पालखी मार्गावरील विहिरी, बोअर अधिग्रहण करण्यात आले होते. ज्या ठिकाणावरून टँकर मध्ये पिण्याचे पाणी भरले जाणार आहे त्या ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य आहे का? याची 15 दिवस अगोदर तीन वेळा टेस्ट केली जाते. त्यानंतर प्रत्यक्ष टँकर मध्ये पाणी भरताना टीशियल पावडर व मेडिक्लोरचा उपयोग केला जातो. पालखी सोहळा विसावा व मुक्कामाच्या ठिकाणी येण्याआधी टँकर तयार ठेवले जातात. रिंगण सोहळ्यावेळी मोठी गर्दी होते. गर्दीतून टँकर काढून ठरलेल्या ठिकाणी पोहोच करणे जबाबदारीचे काम असते. पालखी सोहळयाबरोबर पुण्याहूनही काही टँकर आलेले असतात. टँकर गर्दीतून मार्ग काढत जात असताना  वाहतूक पोलिसांचेही मोठे सहकार्य लाभते. शुद्ध पाणीपुरवठ्यावर देखरेख करण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारीही काम करीत असतात. पंढरपूर विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून ११ उप अभियंते टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी लक्ष ठेवून असतात. दोन्ही पालख्या वाखरीतळावर मुक्कामाला आल्यानंतर मोठी गर्दी होते. या गरजेतून पाण्याचे टँकर बाहेर काढण्यासाठी नियोजन करावे लागते. एमआयटी कॉलेज ते पालखीतळ व कराड– सातारा रोडवर या काळात पिण्याचे टँकर उभे केले जातात.

टँकर स्पॉट फिक्स करणार…

पालखी मार्गावर प्रत्येक यंत्रणेचे ठिकाण ठरलेले आहे. त्यामुळे वारकऱ्यांना सुविधा सहजपणे मिळतात. पाण्याचे टँकर रिकामे होईल तसे बदलावे लागतात. यासाठी टँकरची जागा फिक्स करणे गरजेचे ठरते. त्यामुळे आता पुढील पालखी सोहळ्यासाठी टँकरच्या जागा फिक्स करण्यासाठी त्या ठिकाणी फलक लावण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता धनशेट्टी यांनी सांगितले.

दहा पालख्यांची व्यवस्था…

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणाहून प्रवेशित होणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये 200 सरकारी तर खाजगी 34 टँकर उपलब्ध करण्यात आले होते. 791 पाणी उद्भवात 112 ठिकाणी टँकर फीडिंग करण्याची सोय करण्यात आली होती. यासाठी उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, सहाय्यक प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, रणजीत घोडके, रवींद्र करजगीकर, प्रवीण चव्हाण यांनी परिश्रम घेतले.