- सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दुधाळ जनावरांना धोकादायक ठरणारा लंबी आता हळूहळू आटोक्यात येऊ लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीयांनी लंपी पूर्ण आटोक्यात येईपर्यंत आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत राहावे, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीची बैठक मंगळवारी जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे यांनी जिल्ह्यातील सद्यस्थिती सांगितली. जिल्ह्यात गाय वर्गातील सात लाख 45 हजार 324 जनावरे आहेत. यातील सर्व जनावरांना लसीकरण करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात गेल्या महिन्यात लंबी बाधित जनावरांची संख्या वाढू लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गाय वर्ग जनावरांची वाहतूक व आठवडा बाजाराला बंदी घातली आहे. त्यानंतर जिल्हा परिषद व राज्य पशुसंवर्धन विभागाने लंपी प्रतिबंधासाठी मोठी मोहीम घेतली. यात 820 गावातील जनावरे बाधित आढळली या जनावरांवर उपचार करण्यासाठी 181 केंद्रांची व्यवस्था आहे सद्यस्थितीत दैनंदिन बाधित 73 जनावरे आढळत आहेत आत्तापर्यंत एकूण 9 हजार 667 जनावरांना बाधा झाली. त्यातील 7 हजार 792 जनावरे उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या 1 हजार 146 जनावरे बाधित आहेत. आत्तापर्यंत लंपीने 278 गाई, 52 बैल व 399 वासरे मरण पावलेली आहेत. मृत जनावरांच्या मालकांना शासनाने घोषित केलेल्याप्रमाणे अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. लंपीबाबत राज्य पशुसंवर्धन विभागाने दिलेला अहवाल त्यांनी समितीपुढे मांडला. लंपीबाधित जनावरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे डॉ. नरळे यांनी सांगितले. सध्या लंपीची साथ नियंत्रणात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लवकरच लंपी हद्दपार होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी लंपी पूर्ण नियंत्रणात येण्यासाठी पशुवैद्यकीय यांनी आपले केंद्र सोडता कामा नये. बाधित जनावरांना तात्काळ उपचाराची व्यवस्था करावी, पाऊस न आल्यामुळे जनावरांसाठी वैरण विकास कार्यक्रम राबविण्यात आला आहे. वाटप केलेल्या बियाणांची लागण होत आहे की नाही याची खातरजमा करावी अशा सूचना केल्या.