February 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

दिवाळीपूर्वी “लोकशक्ती’चा भोंगा वाजणार; उद्या रोलरचे होणार पूजन

सोलापूर: दक्षिण सोलापुरात औराद शिवारात उभा करण्यात आलेला लोकशक्ती साखर कारखाना अखेर यंदाच्या गळीत हंगामात सुरू होणार आहे. या कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन चार ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती कोल्हापूरच्या अथर्व ग्रुपचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता कोरवलीचे डॉ. अमोल शिवानंद पाटील व डॉ. नीता पाटील यांच्याहस्ते कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन करण्यात येणार आहे. कारखाना ताब्यात देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मशनरी उभारणीला वेग आला आहे. यंदाच्या दिवाळीत गळीत हंगामाला सुरुवात करण्यात येणार असून पहिल्याचवर्षी पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे चेअरमन खोराटे यांनी सांगितले. अथर्व ग्रुप ऑफ कंपनीजमधील गीतांजली शुगर्सने हा कारखाना चालवायला घेतला आहे. या कंपनीने यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील चांदवड येथील दौलत कारखाना चालवायला घेतला होता. या कंपनीने हा कारखाना घेण्याअगोदर तिघाजणांनी प्रयत्न केला होता. पण तिघांनीही शेतकऱ्यांचे पैसे बुडवले होते. अशा परिस्थितीत या कंपनीकडे कारखाना आल्यानंतर शेतकरी ऊस गाळपला देतील का? याचे टेन्शन होते. पण शेतकऱ्यांनी आमच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि हा कारखाना पहिल्या वर्षापासून चांगल्या पद्धतीने चालला आहे. याच विश्वासावर लोकशक्ती साखर कारखाना चालवायला घेतला असल्याचे चेअरमन खोराटे यांनी स्पष्ट केले. दक्षिण सोलापूर तालुक्यात सीना- भीमाच्या खोऱ्यात साखर कारखाने चालण्यासाठी चांगली संधी आहे. ऊस विकासाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले बेणे व सिंचनासाठी सुविधा कारखान्याच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव व पंधरा दिवसात पैसे देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांच्या विश्वासाला आम्ही पात्र होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काय आहे कारखान्याचा इतिहास…

जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती व मोहोळचे उद्योजक विजयराज डोंगरे यांना आपल्या स्वतःचा एक साखर कारखाना असावा, असे स्वप्न होते. त्यांच्या या स्वप्नाला त्यांचे वडील व जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन मनोहरभाऊ डोंगरे यांनी पाठबळ दिले. अतिशय जिद्दीने त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेरामैलजवळ औराद शिवारात कारखान्यासाठी जमीन घेऊन उभारणी सुरू केली. कारखान्याचे कामकाज अंतिम टप्प्यात असतानाच आर्थिक अडचणीमुळे त्यांच्यासमोर संकट उभा राहिले. या अडचणीतून कारखान्याचा गाळप शुभारंभ घेण्यासाठी त्यांनी राज्यातील अनेक उद्योजकांकडे हेलपाटे मारले पण मदत झाली नाही. त्यामुळे कारखान्याला आर्थिक मदत केलेल्या बँका कर्ज थकल्यामुळे कोर्टात गेल्या. कोर्टाने बँकाची देणी वसूल करण्यासाठी कारखान्याचा लिलाव जाहीर केला. मार्चमध्ये जाहीर झालेल्या लिलावामध्ये राज्यातील मान्यवर बारा कंपन्यांनी सहभाग नोंदवला. त्यात चार कंपन्या रिजेक्ट झाल्या. आठमधून प्रत्यक्ष लिलावच्या वेळी तीन कंपन्या हजर झाल्या. यामध्ये कोल्हापूरची गीतांजली, लातूरची देशमुख यांची शुगर कंपनी आणि मंद्रूपचे युवा उद्योजक मळसिद्ध मुगळे यांची एप्राॅनडिस्टरलरी या तीन कंपन्यांचा समावेश होता. कोर्टाने कारखान्यासाठी 131 कोटीची बोली लावली. शेवटी मुगळे यांच्या कंपनीला लिलाव मंजूर झाला. पण लिलावात मंजूर केलेली बोलीप्रमाणे उर्वरित रक्कम मुदतीत मुगळे भरू न शकल्याने त्यांनी लिलावापोटी जमा केलेली दीड कोटी बयाना रक्कम जप्त झाली. त्यानंतर लवादाने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गीतांजली कंपनीला संधी दिली.  अथर्व ग्रुपच्या माध्यमातून चेअरमन खोराटे यांनी हा कारखाना ताब्यात घेतला. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कारखान्याच्या उभारणीला वेगाने सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. जुनी मशिनरी पुन्हा काढून ऑइलिंग करून बसविण्यात येत आहे. प्रगत तंत्रज्ञान वापरून कारखाना दरवर्षी विविध प्रोजेक्ट राबवून यशस्वी करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.