सोलापूर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांची राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून झालेल्या नियुक्तीला ब्रेक लागला आहे. झेडपीच्या ग्रामपंचायत विभागानंतर बांधकाम विभागाचा नंबर लागल्याने राज्यात आता हा चर्चेचा विषय झाला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांची 15 जुलै दरम्यान बदली झाली. राष्ट्रीय महामार्ग सोलापूरचे कार्यकारी अभियंता म्हणून त्यांना नियुक्ती मिळाली. ते पदभार घेण्यासाठी जाणार तोच त्यांना सोलापुरातील “दादां’चा निरोप मिळाला. त्यामुळे त्यांना पदभार घेता आला नाही. या “दादां’ची भेट घेऊन पदभार घेण्याचा कुलकर्णी यांचा मानस होता. पण या भेटीला हिरवा कंदील मिळाला नाही. त्यामुळे कुलकर्णी यांची महामार्गावरची गाडी सात रस्त्याच्या सिग्नललाच अडकली. त्यामुळे हायवेचा दरवाजा उघडण्याचा त्यांनी नाद सोडल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. लवकरच पदोन्नती असल्यामुळे तोवर विश्रांती करण्याचा निर्धार त्यांनी केल्याचे बोलले जात आहे. एकीकडे देशभर गडकरींचे हायवे चर्चेत असताना सोलापुरातील कुलकर्णींचा हायवे मात्र राजकारणात अडकला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेतील दुसऱ्या अधिकाऱ्याला असा झटका बसला आहे. यापूर्वी लातूरहून सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला आलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांना सात रस्त्याच्या डाक बंगल्यातून परतावे लागले. सोलापुरात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना राजकारणाचे असे झटके बसू लागल्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची नेमकी भूमिका काय? असा सर्वसामान्यांना आता प्रश्न पडला आहे.
गेल्या काही महिन्यात सोलापुरातील बदलत्या राजकारणाचा सरकारी अधिकाऱ्यांना मोठा फटका बसू लागला आहे. पालकमंत्र्याच्या जवळ आलेल्या इतर पक्षातील लोकप्रतिनिधीनीही आता सरकारी अधिकाऱ्यावर वचक बसविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोणाचे ऐकावे असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे दोन देशमुख यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना असा कोणताच त्रास दिलेला नाही. पण त्यांनी केलेल्या शिफारशीही बाजूला ठेवल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव दिसून आले आहे.

More Stories
सोलापूर झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम सर्वोत्कृष्ट सेवाकर्मी
अवैध धंदे, नुकसान भरपाई, डीपीच्या मुद्द्यावर गाजली डीपीसीची बैठक
फोंडशिरसच्या मतदान केंद्राध्यक्ष व पोलिसाला निलंबित करण्याचे आदेश