सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालयसामाजिक

“सोनहिऱ्या’च्या पाण्यातून काढली दोघा सेवानिवृत्त शिक्षकांनी वाट

सोलापूर : स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही दक्षिण सोलापूर तालुक्यातील देवकुरळी येथील ओड्यावरील रस्त्याकडं शासन अन् लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष झाले आहे. दरवर्षी या मार्गावरील सोनहिऱ्या ओढ्याला येणाऱ्या पुरामुळे या गावचा रस्ता थांबतो आणि गावकऱ्यांची गैरसोय होते. लोकांची गैरसोय थांबवण्यासाठी दोन सेवानिवृत्त शिक्षकांनी पुढाकार घेतला आणि गावकऱ्यांचा प्रश्न सुटला आहे.

आयुष्यभर विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांना पायावर उभा करणाऱ्या शिक्षकांनआपल्या गावच्या रस्त्याचा प्रश्न सुटत नाही ही एक खंत होती. पावसाळ्यात ओढ्याला येणाऱ्या पुरामुळे रस्ता बंद झाल्यावर हात पसरायचे कोणाकडे? दरवर्षीचाच हा प्रश्न. शेवटी या शिक्षकांच्या कल्पकतेनं सोनहिऱ्यातील दलदलीला वाट मोकळी झाली आहे. लोकवर्गणीची जोड देत या शिक्षकांनी स्वतःच्या खिशातील पैसे खर्चून या रस्त्याचे काम केले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव, गंगेवाडी ही जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गावं. या गावांचं जिथं शिवार संपतं तिथं मराठवाड्यातील आजच्या धाराशिव जिल्ह्याची हद्द सुरू होते. कधीकाळी सोलापूर जिल्ह्यातील या सीमावर्ती गांवाहून मराठवाड्याची दळण-वळणाची नाळ जोडणारा मार्ग आणि प्रमुख ठाणे म्हणूनही या गावाकडे पाहिलं जात होतं.

स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही शासन दुर्लक्षित मार्ग म्हणून हा मार्ग स्वतःची ओळख कायम ठेऊन आहे. कासेगांव-देवकुरुळी मार्ग हा तो रस्ता.या मार्गावर “सोनहिरा’ जनमानसात ओळख असलेल्या नाल्याजवळ शेतकऱ्यांना वाट काढताना नाकी नऊ येत होते. या सोनहिऱ्यातील दरवर्षी साठणाऱ्या पाण्याला कासेगावातील विठ्ठल ढेकळे आणि मुबारक तांबोळी या मित्रांनी लोकवर्गणीतून वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला आहे, तो निश्चितच कौतुकास्पद मानला जातोय.

कासेगावापासून देवकुरुळी गावाला जोडणारा रस्ता महाराष्ट्र शासनाच्या गायरान तथा सामाजिक वनीकरणाच्या ५०२ एकराच्या वन क्षेत्राजवळून जातो. या अवघ्या पाच किलोमीटरचं अंतर असलेल्या रस्त्यावर सुमारे तीन दशकापूर्वी एकदाच मनुष्यबळावर खडीकरणाचं काम झालं असल्याचे शेतकरी सांगतात. याच खडीच्या आणि दगड-गोट्यांच्या खाचखळग्यातून बळीराजा आपली शेती कसण्यासाठी ठेचा खात जातोय. पावसाळ्यात तर देवकुळी रस्त्याची पार दुर्दशा झालेली असते, त्यातच सोनहिरा म्हणून सर्व परिचित असलेल्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी येऊन हा रस्ता बंद पडतो. 1972 च्या दुष्काळात कासेगावचा पाझर तलाव म्हणून बांधलेल्या आणि आज मितीला महसुली क्षेत्र गंगेवाडीच्या नकाशात असलेल्या पाझर तलावात जाऊन मिळतो. या सोनहिऱ्यात पावसाळ्यात सहजा-सहजी गुडघ्या, मांड्याइतकं थांबणाऱ्या पाण्यातून देशाच्या प्रगतीचा कणा म्हणून पाहिला जात असलेला बळीराजा वाट काढत निघतो. ही समस्या या परिसरातील सर्व शेतकरी आणि शेतकरी कुटुंबीयांची शेतमजूर आणि महिला मजुरांची आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी विठ्ठल ढेकळे आणि मुबारक तांबोळी या मित्रांनी शेतकऱ्यांचे समुपदेशन आणि लोक वर्गणी करून इथं थांबणाऱ्या पाण्याला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला आहे, तो कौतुकास्पद आहे. या रस्त्याकडे शासन आणि लोकप्रतिनिधींनी ‘डोळस’ पणे पाहण्याचीही गरज  असल्याचे प्रतिक्रिया स्थानिकांमधून उठत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button