सोलापूर : माध्यमिक शिक्षण विभागाने जारी केलेल्या शिक्षक पुरस्काराच्या परिपत्रकात राष्ट्रीय महापुरुषाच्या नावामध्ये गंभीर चूक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरुण तोडकर यांनी याचा निषेध केला असून या प्रकरणाची चौकशी करून शिक्षणाधिकार्यावर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे केली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. चालू वर्षाच्या पुरस्कार प्रस्तावाच्या शिफारसीसाठी शिक्षण संचालकांनी केलेल्या सूचनेनुसार आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय बैठकीत प्रस्तावाची छाननी करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा उल्लेख सावित्रीभाई असा केला आहे. असा उल्लेख असलेले परिपत्रक जिल्हाधिकारी, शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व इतरांना पाठविले आहे. हे परिपत्रक व्हायरल झाल्यानंतर शिक्षकांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रीय महापुरुषाबाबत शिक्षण विभागात असे बेफिकीरपणे वागत असेल तर कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरुण तोडकर यांनीही या परिपत्रकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या उल्लेखाबाबत शिक्षण विभागाने दाखविलेल्या बेफिकीरबाबत निषेध व्यक्त केला आहे. माध्यमिक शिक्षण विभागातील गोंधळ चर्चेत आहे. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या सहीनिशी हे परिपत्रक व्हायरल झाले आहे. त्यांनी या पत्रकातील मजकुराविषयी शहानिशा करायला हवी होती. त्यांच्या या बेफिकिरीची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दुसरे परिपत्रक व्हायरल…
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराच्या प्रस्ताव छाननीच्या परिपत्रकाची अशी चर्चा होत असतानाच शिक्षकांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यासहिनिशी शाळांना पाठविण्यात आलेले दुसरे परिपत्रक व्हायरल झाले आहे. तत्कालीन माध्यमिक शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे व मारुती फडके यांनी दिलेल्या मान्यतेची चौकशी करण्यासाठी उपसंचालकांच्या आदेशाद्वारे सात जुलै रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे असे परिपत्रक सहा ऑगस्ट रोजी काढण्यात आल्याचे दिसून येत आहे. माध्यमिक शिक्षण विभागात चाललय काय असा सवाल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
पत्र एडिट केले गेले…
मी बुधवारी पुण्यात होतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेले ते पत्र मी पाहिले. पण माझ्याकडे नोंद असलेल्या पत्रावर क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले असा उल्लेख आहे. कोणीतरी एडिट करून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. मी याबाबत चौकशी करून संबंधिताविरुद्ध पोलीस तक्रार करणार आहे असा खुलासा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केला आहे.
वायरल दुसरे पत्र…


More Stories
माढा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फलोत्पादन मंत्री गोगावले यांच्याकडून पाहणी
सोलापुरात रमजान ईद उत्साहाने साजरी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सोलापुरात आध्यात्मिक मानवंदना