सोलापूर : माझी वसुंधरा अभियानात दक्षिण सोलापुरातील मंद्रूप गावाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. आता नव्याने सुरू झालेल्या मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध अभियानातही मंद्रूप ग्रामपंचायतीने हॅट्रिक साधली पाहिजे, अशी अपेक्षा आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. मंद्रूप गावाच्या विकासाचा पॅटर्न तयार होण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून मी कोणतीही मदत करायला तयार आहे, असे अभिवचन देशमुख यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभप्रसंगी आयोजित ग्रामसभेला आमदार सुभाष देशमुख यांनी हजेरी लावली. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव व सरपंच अनिता कोरे यांच्याहस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उपसरपंच भगवान व्हनमाने, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती आप्पाराव कोरे, अपर तहसीलदार सुजित नरहिरे, मंडल अधिकारी ज्योतीराम पवार, तलाठी कोकरे, कृषी सहाय्यक रमेश फरताडे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे शिवपुत्र जोडमटे शिवानंद लोभे सुरेश मेंडगुले अंकिता कुंभार, मुख्याध्यापक प्रकाश कुंभार, भाजपचे तालुकाध्यक्ष संगपा केरके आदी उपस्थित होते.
आमदार सुभाष देशमुख यांनी माझी वसुंधरा अभियानामध्ये मंद्रूप ग्रामपंचायतने राज्यभर केल्याबद्दल सरपंच अनिता कोरे व ग्रामविकास अधिकारी नागेश जोडमोटे यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही मोठी योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी पुरस्कृत ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षिसाच्या मोठ्या रकमा ठेवण्यात आले आहेत. असे बक्षीस मिळवणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. माझी वसुंधरा योजनेप्रमाणेच मंद्रूप ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ही बाजी मारावी अशी अपेक्षा आमदार देशमुख यांनी व्यक्त केली. यासाठी मंद्रूप ग्रामस्थ व विशेष करून महिलांनी पुढाकार घ्यावा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून यातून मिळणाऱ्या रकमेतून गावातील महिलांनी संस्था स्थापन करावी. या संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या पैशाचा विनीयोग स्वतःच्या कुटुंबाचा विकास व त्याचबरोबरीने गावच्या विकासासाठी हातभार लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली. मंद्रूप गावच्या विकासासाठी मी राजकारण बाजूला ठेवून मदत करण्यासाठी तयार आहे. मंद्रूप हे कृषीसमृद्ध गाव आहे. या गावातून सोलापूरकडे जाणाऱ्या निशिगंध फुलातून अत्तर तयार व्हावा. त्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे असे सांगितले.
ग्रामस्थांच्या हातात विकास…
माझी वसुंधरा अभियानात मंद्रूप ग्रामपंचायतने राज्यभर नाव कमाविले. आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराजमध्येही मंद्रूपने बाजी मारायची असेल तर ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन स्वच्छ भारत मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात कोणकोणत्या गोष्टीचा समावेश आहे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे यांच्या संकल्पनेतून ही योजना आली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला काम करण्यास मोठी संधी आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्याबरोबर गावातील घनकचरा, सांडपाणी, प्लास्टिक कचरा संकलन व विलगीकरण, स्वच्छ पाणीपुरवठा, रोजगार, कृषी योजना, स्मार्ट स्कूल, स्मार्ट अंगणवाडी, महसूलचा पुढाकार आदी बाबी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून परसबाग, शौचालय वापरावर भर द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
गावरस्ते येणार नकाशावर…
मंडल अधिकारी ज्योतीराम पवार यांनी महसूल विभागामार्फत सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांना रस्त्यांबाबत मोठ्या अडचणी येतात. गेल्या 70 वर्षात शेतीसाठी अनेक शिवार रस्ते आहेत. पण हे रस्ते नकाशावर नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे महसूल विभागाने शिवाररस्ते नकाशावर आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. अशा रस्त्यांचे संकलन होत आहे. परंतु पावसाचा व्यत्यय आल्यामुळे काम थांबले आहे. महसूलच्या नजरेतून काही रस्ते सुटण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शिवार रस्त्याची माहिती तलाठ्याकडे द्यावी, अशी सूचना मांडली.


More Stories
माढा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फलोत्पादन मंत्री गोगावले यांच्याकडून पाहणी
सोलापुरात रमजान ईद उत्साहाने साजरी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सोलापुरात आध्यात्मिक मानवंदना