March 3, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

विभागीय आयुक्त पुलकुंडवार तुमचा सोलापूर झेडपी सीईओवर भरोसा नाय का?

सोलापूर : पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांचा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यावर भरोसा नाय का? असा सवाल कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. त्याला कारण हे तसेच आहे. विभागीय आयुक्तांकडून जिल्हा परिषदेला पत्र आले आहे. यात उप आयुक्तांनी जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत कोट्यातील भरती झालेल्या घोटाळ्यासंदर्भात चौकशी समिती नेमण्या संदर्भात सीईओना मार्गदर्शन केले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेत सन 2021 मध्ये झालेल्या कर्मचारी भरती घोटाळा गाजत आहे. यावेळी भरती करताना ग्रामपंचायत कोट्यातील 55 कर्मचारी अतिरिक्त भरण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेने हे स्पष्टीकरण दिल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने याबाबत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या सीईओ नीच याबाबत आठवड्यात निर्णय घ्यावा असा निर्णय दिला आहे. यावर सीईओ कुलदीप जंगम यांनी आपला निर्णय संघटनेला कळविलेला आहे. असे असतानाही संघटनेने न्याय मिळावा अशी भावनिक साद घालत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर 16 सप्टेंबर रोजी आमरण उपोषण केले. विभागीय आयुक्त कार्यालयाने या एका दिवसाच्या उपोषणाची तात्काळ दखल घेतली. आस्थापना विभागाचे उप आयुक्त नितीन माने यांनी यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या नावे तात्काळ पत्र जारी केले. या भरतीबाबत जिल्हा परिषद प्रशासन सन 2019 च्या कर्मचारी भरतीबाबत 55 पदे अतिरिक्त झाली आहेत, अशी खोटी व दिशाभूल करणारी माहिती देत आहे. यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर अन्याय होत आहे. याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमून व संघटनेला वेळ देऊन त्यांचे म्हणणे विचारतात घेऊन पंधरा दिवसात चौकशी करावी व आवश्यकता वाटल्यास शासनाचे मार्गदर्शन घ्यावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल युनियनला द्यावा असे सुचित केले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेला हे पत्र देताना उप आयुक्त नितीन माने यांनी या प्रकरणाची जुजबी माहिती घेत केवळ संघटनेला मदत करण्याच्या उद्देशाने कार्यवाही केल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या दोन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 2021 च्या कर्मचारी भरतीत अनियमित झाल्याचा शासनाला अहवाल दिला आहे. याबाबत शासनाकडून उच्चस्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे. याबाबत संघटनेने त्यावेळीच विभागीय आयुक्तांकडे प्रश्न मांडण्याऐवजी न्यायालयात धाव घेतली. याबाबत न्यायालयाने स्पष्ट निर्णय दिला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपले लेखी स्पष्टीकरण संघटनेला दिलेले आहे. तसेच कर्मचारी भरतीत अनियमितता केल्याप्रकरणी तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांच्यासह चौघा जणांवर विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. असे असताना न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या सीईओना पुन्हा चौकशी समिती स्थापन करण्याबाबत पत्र काढले आहे. या पत्रावरून विभागीय आयुक्तांना जिल्हा परिषदेच्या सीईओवर भरोसा नसल्याचे दिसून येत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखीन गंभीर झाले आहे.

सीबीआयकडे चौकशी द्यावी…

जून 2021 मधील सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरती प्रकरणात घोटाळा केल्याप्रकरणी तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह चार जणांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करावा व हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे द्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.