सोलापूर : नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा आणि सांगोला या तीन तालुक्यांच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय व आढावा बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निजी कक्षात संपन्न झाली. बैठकीत आकांक्षित तालुक्यांमधील विविध विकास निर्देशांकांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
देशातील सर्वाधिक मागासलेल्या ५१३ तालुक्यांच्या तसेच महाराष्ट्रातील २७ तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाने आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरू केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा आणि सांगोला या तीन तालुक्यांचा या कार्यक्रमात समावेश आहे. नीती आयोगाच्या क्रमवारीत अक्कलकोट तालुका राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असून, देशात 52 वा क्रमांक असून सांगोला तालुकाही प्रगतीपथावर असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत आरोग्य, पोषण महिला बाल विकास, शिक्षण, कृषी व पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या क्षेत्रांतील विविध निर्देशांकांवर विशेष भर देण्यात येत आहे. जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांच्या प्रगतीचे ३८ निर्देशांकांच्या आधारे नियमितपणे मूल्यमापन केले जात असून, बैठकीत प्रत्येक विभागाच्या कामगिरीचे सादरीकरण करण्यात आले.
आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, ग्रामविकास तसेच अन्य संबंधित विभागांच्या कामकाजाचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. प्रलंबित बाबी तातडीने पूर्ण करून शासनाने निर्धारित केलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आकांक्षित तालुका कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून संयुक्तपणे कार्य करावे, तसेच विकासाच्या प्रत्येक निर्देशांकात ठोस प्रगती साधण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, अक्कलकोटचे गटविकास अधिकारी शंकर कवितके, करमाळ्याचे गटविकास अधिकारी अमित कदम, सांगोल्याचे सहगटविकास अधिकारी वसंत फुले, जिल्हास्तरीय संबंधित विषयांचे खातेप्रमुख, तालुका स्तरावरील सर्व विभागप्रमुख, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, ग्रामविकास विभागांचे अधिकारी तसेच तालुका फेलो कर्मचारी उपस्थित होते.अक्कलकोटची राज्यातील तिसऱ्या क्रमांकाची कामगिरी कायम राखत आणखी उंचावणे, तसेच करमाळा व सांगोला तालुक्यांच्या प्रगतीला गती देऊन आकांक्षित तालुका कार्यक्रमाच्या उद्दिष्टांची प्रभावी पूर्तता करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

More Stories
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचेवतीने गुणवंत पाल्यांचा सन्मान
मुख्यमंत्री फडणवीस, प्रशांत परिचारक यांच्या अभिनंदनचा ठराव
“बालक निरोगी तर भविष्य सुरक्षित’; सीईओ कुशल जैन यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य तपासणीला गती