सोलापुरातील शाळांनी पोस्ट सेवेद्वारे जवानांसाठी पाठविला फराळ

Rajkumar Sarole
2 Min Read

सोलापूर : देशाच्या सीमेवर दिवसरात्र सज्ज राहून राष्ट्ररक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या आपल्या जवानांसाठी सोलापूर हेड पोस्ट ऑफिसतर्फे दिवाळी फराळ प्रेषित करण्याचा उपक्रम यंदाही अत्यंत उत्साहात पार पडला. या उपक्रमात सोलापूर शहरातील नामांकित शाळांनी मनापासून सहभाग नोंदविला.

या उपक्रमांतर्गत कै. वि. मो. मेहता विद्यालय, हरिभाई देवकरण विद्यालय, एस. पी. एम. इंग्लिश स्कूल, नूतन मराठी प्रशाला, एन. व्ही. एम. शिशु शाळा या शाळांनी मिळून जवळपास 663 किलो वजनाचा दिवाळी फराळ एकूण 51 पार्सलद्वारे देशाच्या सीमावर्ती भागांतील सैनिकांना पाठविला.

या फराळामध्ये चकली, लाडू, करंजी, शेव, चिवडा, अनारसे यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः प्रेमाने फराळ तयार करून सुंदर पॅकिंगद्वारे हे पार्सल सजविले. या प्रत्येक पार्सलसोबत विद्यार्थ्यांनी “जवानांसाठी दिवाळी शुभेच्छा पत्र” सुद्धा जोडले आहे .ज्यातून त्यांच्या देशभक्तीचा आणि आपुलकीचा सुंदर प्रत्यय आला आहे.

सोलापूर हेड पोस्ट ऑफिसचे अधिकारी सुकदेव मोरे आणि कर्मचारी यांनी या पार्सलचे संकलन, वजन, बुकिंग आणि प्रेषणाची संपूर्ण जबाबदारी अत्यंत नियोजनपूर्वक पार पाडली. पोस्ट ऑफिसतर्फे शाळांमधून आलेल्या पार्सलना सुलभ आणि जलद गतीने सैनिकांपर्यंत पोहोचविण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली.या उपक्रमाबद्दल सुखदेव मोरे, वरिष्ठ डाकपाल, प्रधान डाकघर, सोलापूर यांनी सर्व शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “जवान आपल्यासाठी सीमांवर उभे आहेत, त्यांच्यापर्यंत आपल्या प्रेमाची आणि आदराची भावना पोहोचविण्याचा हा एक लहान पण हृदयस्पर्शी प्रयत्न आहे.”  सोलापूर वासियांना आवाहन करतो की जर कोणाला असे पार्सल जवानांना किंवा परदेशात राहत असलेल्या नातेवाईकांना पाठवायचे असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये पार्सल बॉक्सेस वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असून नागरिकांनी ह्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य डकपाल मोरे केले आहे. याकरिता सोलापूर प्रधान डाक घर येथे नागरिकांना संपर्क साधावा लागणार आहे.

या प्रसंगी शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, “फराळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जोपासली जाते आणि समाजसेवेचा संदेशही दिला जातो.”

सोलापूर हेड पोस्ट ऑफिस परिसरात या उपक्रमामुळे उत्सवमय आणि देशभक्तीने भारलेले वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमामुळे सोलापूर शहरातून देशभरात एक सुंदर संदेश गेला आहे. “आपण कुठेही असलो तरी आपल्या सैनिकांसोबतच आपली दिवाळी साजरी होते!”

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *