December 5, 2025

Solapur Samachar

Latest Marathi News

बापरे..! मोन्थी चक्रीवादळाचा सोलापूरला फटका

सोलापूर : मोन्थी चक्रीवादळाचा सोलापूरला अखेर फटका बसला आहे. दक्षिण सोलापुरातील मंद्रूप, वांगी, हत्तुर, वडकबाळ परिसरात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला आहे.

मोंथी चक्रीवादळामुळे गेल्या तीन दिवसात सोलापूरच्या हवामानात बदल झाला आहे. दिवसभर  ढगाळ हवामान राहत असल्यामुळे पाऊस येणार याची चाहूल लागली होती. पण गेल्या दोन दिवसात पाऊस आला नव्हता. बुधवारी सकाळी सोलापुरात रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे हवामान विभागाने दिलेल्या इशाराप्रमाणे सोलापूरला या वादळाचा फटका बसणार अशी चिन्हे दिसत होती. बुधवारी दिवसभर ढगाळी वातावरण होते. सायंकाळी चार नंतर सूर्यदर्शनही झाले. त्यामुळे सर्वांना हायसे वाटले होते. मंद्रूप परिसरात सायंकाळी सात वाजता अचानक ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. हत्तुर, वडकबाळ, वांगी आणि मंद्रूप परिसरात जोरदार पाऊस झाला. विजाच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. पावसाने उघडीत दिल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतीची कामे सुरू केली आहेत. अशात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. नको रे बाबा पाऊस अशी अवस्था झाली आहे. पण अचानक आलेल्या या पावसाने पुन्हा शेतांमध्ये तळी साचली आहेत. सीना नदीच्या महापुरामुळे हत्तुर वडकबाळ वांगी या परिसरातील शेतकरी अडचणीत असतानाच पुन्हा अचानक आलेल्या या पावसाने मोठे नुकसान केले आहे. शेतातील कांदा, भुईमूग हातचा गेला आहे. तुरीची फुलगळ झाल्याने आता मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागणार आहे. गमतीचा भाग म्हणजे सोरेगावनंतर सोलापुरात पावसाचा थेंब नाही.