सोलापूर : पत्रकार दिनानिमित्त राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते जिल्हा परिषद बीटवरील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
पालकमंत्री जयकुमार गोरे मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आले असून ग्रामविकास विभागाच्या सुनावण्या असल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या सुनावण्या घेण्यासाठी ते थेट जिल्हा परिषदेत आले. सीईओंच्या कॉन्फरन्स रूममधून त्यांनी सुनावण्या घेतल्या. त्यानंतर पत्रकार दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद बीटवरील ज्येष्ठ पत्रकार राजकुमार सारोळे, शेखर गोतसुर्वे, शिवाजी सावंत, राजेश भोई, शरीफ सय्यद यांचा पालकमंत्री गोरे यांनी सन्मान केला. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील विकासासाठी जिल्हा परिषद राबवित असलेल्या योजनांमध्ये पत्रकारांचा मोलाचा वाटा असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी यावेळी सांगितले. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री स्वच्छ ग्राम अभियानाचा आढावा घेतला. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या वेब पेजला 25 हजार फॉलोवर्स असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी सांगितले. अभियानासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ यांनी दिली. अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाची वेब पेजवरिल क्लिप पालकमंत्री गोरे यांनी ऐकली. उपक्रमाबाबत अपलोड केलेल्या व्हिडिओबाबत त्यांनी सूचना केल्या.
झेडपी प्रशासनातर्फे सन्मान…
जिल्हा परिषद प्रशासनातर्फेही पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर हे होते तर प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जलजीवन चे प्रकल्प संचालक अमोल जाधव, महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, संतोष कुलकर्णी उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते पत्रकारांचे आद्य गुरु दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर दिवंगत पत्रकार बळीराम सर्वगोड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर, मिरकले, स्मिता पाटील यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी पत्रकारांनी विकासात्मक पत्रकारिता करताना सर्व बाबी पडताळून पाहिल्या पाहिजेत असे सुचवले. ज्येष्ठ पत्रकार राजकुमार सारोळे विकासात्मक पत्रकारितेला बळ देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुरस्कार सुरू करावेत, अशी सूचना मांडली. शेखरगोत सुर्वे यांनी बीटवरील पत्रकारांना अपघात विमा देण्यासंबंधी प्रशासनाने पाऊल उचलावे असे सुचवले. प्रारंभी प्रशासन विभागाचे प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांनी स्वागत केले. स्वच्छ भारत मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहाय्यक प्रशासनाधिकारी साळुंखे, सीईओंचे स्वीय सहाय्यक सुरजरतन नदाफ यांनी परिश्रम घेतले.



More Stories
रेड कार्पेट; सोलापूर झेडपी अध्यक्ष निवडीची जय्यत तयारी
सांगोल्यात दहावीच्या भूगोलच्या पेपरची चोरी; तरीपण ठरल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची परीक्षा होणार
अखेर.. सोलापूर झेडपीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष ठरले