February 21, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

करकंबमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या दारू धंद्यावर धाड

सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आमदार अभिजीत पाटील यांनी करकंबमध्ये दारू धंदे सुरू असल्याची तक्रार केल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याच्या दारू धंद्यावर धाड मारून देशी दारूच्या 27 बाटल्या जप्त केल्या आहेत.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हा नियोजन समितीची सभा झाली. या सभेत आमदार अभिजीत पाटील यांनी करकंब पोलीस ठाण्याच्या एपीआय वर निशाणा साधत खुलेआम दारू धंदे सुरू असल्याची तक्रार केली. निवडणूक आणि लग्न कार्याच्यावेळी येथील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता खुलेआम दारूचा पुरवठा करत असल्याची ही तक्रार होती. या तक्रारीची शहनिशा करून कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री गोरे यांनी दिले होते. पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना खातरजमा करण्याची सूचना केली. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार खाजा मुजावर, सहाय्यक फौजदार तानाजी गाडे, पोलीस शिपाई अक्षय डोंगरे, संदीप हुलगे, सतीश बुरुकुल यांच्या पथकाने करकंब गाठले. जाधव वाडीतील दत्तात्रय चव्हाण यांच्या शेतातून दारूचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळताच या पथकाने मोटार सायकलवर जाऊन तेथे धाड मारली. पोलिसांची चाहूल लागताच दत्तात्रय चव्हाण पळून गेला. त्याच्या वस्तीची झाडझडते घेतल्यानंतर तेथे पोतेवर रिकाम्या बाटल्या मिळून आल्या तर 27 बाटल्या दारूने भरलेल्या होत्या. याप्रकरणी दत्तात्रय चव्हाण यांच्याविरुद्ध करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.