सोलापूर : शहराच्या विकास आराखड्यातील तसेच अक्कलकोट रस्ता, होटगी रस्ता एमआयडीसीतील रस्त्यांकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या वाढीव निधीच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ होकार दिला. जिल्हा वार्षिक नियोजन बैठक (राज्यस्तर) गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीस व्हिडीओ कॉन्फरन्सवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानावरून मार्गदर्शन केले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, शहराच्या विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. परंतु सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीतून वाढीव निधी देण्यात यावा. त्याचप्रमाणे अक्कलकोट रस्ता आणि होटगी रस्ता एमआयडीसीतील रस्त्यांकरिता लागणारा निधी ७५ टक्के राज्य शासन आणि २५ टक्के उद्योजकांकडून घेण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय उद्योजकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयात बदल करून ७५ टक्के राज्य शासन आणि २५ टक्के जिल्हा नियोजन समिती किंवा महापालिकेकडून घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्यात, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या मागणीला तत्काळ मंजुरी देत या मागणीप्रमाणेच निर्णय होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले.
अक्कलकोट रस्ता एमआयडीसी आणि होटगी रस्ता एमआयडीसीतील उद्योजकांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन औद्योगिक वसाहतींमधील समस्या सोडविण्याची मागणी केली होती. याप्रकरणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचा शब्द उद्योजकांना दिला होता. महानगरपालिका निवडणुकांच्यावेळीही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अक्कलकोट रस्ता आणि होटगी रस्ता एमआयडीसीतील रस्त्यांसह इतर सुधारणांसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते. आचारसंहिता संपताच पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करून हा विषय मार्गी लावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहराच्या विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी देण्याच्या मागणीला होकार दिल्यामुळे शहरातील तसेच एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या कामाला आता वेग येणार आहे. या बैठकीस आमदार देवेंद्र कोठे, प्रभारी जिल्हाधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे तसेच शहर आणि जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.
उद्योजकांना मोठा दिलासा
अक्कलकोट रस्ता तसेच होटगी रस्ता औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांकरिता उद्योजकांकडून २५ टक्के रक्कम घेण्याचा निर्णय झाल्यामुळे उद्योजकांमध्ये अस्वस्थता होती. सोलापूरच्या उद्योग जगताला पुन्हा पूर्वीप्रमाणे ‘अच्छे दिन’ येण्यासाठी २५ टक्के रक्कम उद्योजकांनी भरण्याच्या नियमात बदल करावा, अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन आमदार देवेंद्र कोठे यांनी हा प्रश्न शासन दरबारी मांडत उद्योजकांवरचा भार हलका करत मुख्यमंत्र्यांकडून अतिरिक्त निधीकरिता होकार मिळवल्यामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोलापूर शहरात आयटी पार्क येण्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते विकासासाठी वाढीव निधी देण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळालेला होकार शहर विकासासाठी फलदायी ठरणार आहे
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

More Stories
सोलापूरच्या वाहन मालकाकडून 35 हजाराची लाच घेताना पुण्याचा फौजदार अटकेत
युरोपमधील “पॅरिसमहल’ मध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली शिवजयंती
सोलापूर महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाला पहिल्याच सभेत नामुष्की