सोलापूर : सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी पाणीपुरवठा सुधारणा केलो तरच मत मागायला येतो, अशी प्रतिज्ञा केली आहे. गेल्या दहा वर्षात पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली नाही. कोठे यांच्या या प्रतिज्ञामुळे फरक पडला तर सोलापूरकरांचे नशीबच. पण छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय तथा सिविल हॉस्पिटलमधील ही परिस्थिती पाहिली तर देवेंद्र कोठे यांना या समस्येत लक्ष घालावेच लागणार आहे.
सोलापूरला दररोज पाणीपुरवठा करण्याचे अभिवचन देऊन भाजपने यापूर्वी महापालिकेत सत्तांतर केले. आठ वर्षानंतर ही परिस्थिती पालटली नाही. आता दुहेरी जलवाहिनीचे उदाहरण देत सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी पाणीपुरवठा सुधारणा करतो अन्यथा मतच मागायला येत नाही, अशी प्रतिज्ञा केली आहे. यंदाच्या पावसाळ्यात भीमा नदीला तीन महापूर येऊन गेले. पण गतवर्षी उन्हाळ्यात जी स्थिती होती ती आत्तापर्यंत सोलापूर शहर पाणीपुरवठ्याची आहे. सोलापूर शहरातील गावठाण भागाला तीन दिवसाआड तर जुळे सोलापूर व इतर हद्दवाढ भागात सात दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. देवेंद्र कोठे यांच्या प्रतिज्ञानंतरही पाणीपुरवठ्यात सुधारणा झालेली नाही. आशा करूया की जुळे सोलापूर व हद्दवाढ भागाचे दिवस कमी होतील. याउलट यापूर्वी काँग्रेस सत्तेत असताना दुष्काळात दुबार पंपिंग करून जुळे सोलापूर व हद्दवाढ भागाला तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे ढिसाळ नियोजन याला कारणीभूत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला कितपत यश येईल याबद्दल नागरिकांतून शंका व्यक्त केली जात आहे.
पाणीपुरवठ्याचे जाऊ द्या पण शहरातील आरोग्य यंत्रणा सध्या सलाईनवर दिसून येत आहे. सोलापूरचे सिव्हिल हॉस्पिटल आमदार देवेंद्र कोठे यांच्या मतदारसंघात आहे. सिव्हिलमधील रस्ते उखडलेले आहेत. चतुर्थ श्रेणी कर्मचारी नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर ओढावे लागत आहे. खड्डे पडलेल्या रस्त्यावरून स्ट्रेचर नेताना रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी तारांबळ होत असल्याचे चित्र सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिसून येत आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील अनेक यंत्रणा बंद असल्यामुळे गरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागत आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. माजी आरोग्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून जिल्हा रुग्णालय झाले. पण या ठिकाणीही डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे अपुरे संख्याबळ असल्यामुळे सुविधा पुरविण्यात अडचणी येत आहे. महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका संपल्यामुळे आता पालकमंत्री जयकुमार गोरे यांना जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात लक्ष घालावे लागणार आहे. सिव्हिल हॉस्पिटल मधील अंतर्गत रस्ते व सुविधांबाबत बैठका लावून प्रश्न मार्गी लावावा लागणार आहे.

More Stories
जिल्हा परिषदेत पदाधिकारी निवडीपेक्षा जयकुमार गोरे यांच्या पॅटर्नची चर्चा
स्वच्छ भारत मिशनच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न लागला मार्गी
माळशिरस पंचायत समितीतील वरिष्ठ सहाय्यक नागटिळक जाळ्यात