March 24, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

कृषी धान्य महोत्सवात मंद्रूपच्या हुरड्याने खाल्ला “भाव’

सोलापूर : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सोलापुरात आयोजित तीन दिवशीय जिल्हास्तरीय कृषी धान्य महोत्सवात मंद्रूपच्या हुरड्याने भाव खाल्ला आहे.

कृषी विभागातर्फे हुतात्मा स्मृती मंदिरात कृषी धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात कृषी विभागाने 46 स्टॉल लावले आहेत. त्यात मंद्रूपच्या मळसिद्ध कोकळगी यांना हुरड्याचा स्टॉल मिळाला आहे. कृषी विभागाने महोत्सवाच्या उद्घाटनाच्या सत्रातच उपस्थित पाहुण्यांना हुरड्याचा आस्वाद दिला. यंदा अति पावसामुळे रब्बी हंगाम लांबल्यामुळे हुरडा उशिरापर्यंत टिकून आहे. दक्षिण सोलापुरातील मंद्रूप, अकोले मंद्रूप, कंदलगाव मोहोळ तालुक्यातील कामती परिसरात हुरड्याचे प्लॉट शेतकऱ्यांनी तयार केले आहेत. मंद्रूप येथील मळसिद्ध कोकळगी यांनी गेल्या तीन वर्षापासून हुरड्याचे मार्केटिंग केले आहे. त्यामुळे कृषी विभागाने या महोत्सवात कोकळगी यांना हुरड्याचा स्टॉल लावण्याची संधी दिली. या महोत्सवाला येणाऱ्या पाहुण्यांना हुरड्याचा आस्वाद दिला. पहिल्याच दिवशी सुमारे दोन क्विंटल हुरड्याची विक्री झाली. 200 ते 250 रुपये किलोने हुरड्याची विक्री झाली. उपस्थित लोकांनी कोकळगी यांच्या स्टॉलला चांगली पसंती दिल्याबद्दल कृषी विभागातर्फे जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. उद्घाटनानंतर लगेच हुरडा संपला. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही हुरड्याला लोकांनी चांगलीच मागणी नोंदवली.

या महोत्सवात सेंद्रिय गुळ, काकवी, गुळाचा चहा, मंगळवेढ्याची प्रसिद्ध ज्वारी, हुरडा, जांभूळ कुल्फी, ज्वारीचे बिस्किटे, केळी, शेवगा पावडर, मध, वाळवन पदार्थ, वाळवलेला भाजीपाला, मल्टीमीलेट आटा,  ज्वारी व बाजरीची कडक भाकरी, शेंगाची चटणी, खारोटे, बार्शीचा शाळू, काळी कुसळी सोना मोती गहू, घाण्यावरील करडई तेल, हळद, शेवया खीर, कच्च्या केळांची पावडर, गुलकंद आवळा कोरफड, मोरावळ, सेंधव मीठ आदी खाद्यपदार्थाचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. या महोत्सवात शेतकऱ्यांना लागणारे आधुनिक टोकन यंत्रही मांडण्यात आली आहेत. तसेच ज्वारी संशोधन केंद्राचा स्टॉल व माती परीक्षण केंद्राबाबत ही शेतकरी माहिती जाणून घेत आहेत. बुधवारी या महोत्सवाचा शेवटचा दिवस राहणार आहे. जिल्हास्तरीय कृषि व धान्य महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. उद्घाटनप्रसंगी राहीबाई पोपरे यांनी देशी बियाणे, पारंपरिक वाणांचे संवर्धन तसेच दुर्मिळ होत चाललेल्या स्थानिक प्रजातींचे जतन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महोत्सवाला सोलापूर शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यानंतर तांत्रिक सत्रामध्ये पौष्टिक तृणधान्य व भरडधान्य लागवड तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, विपणन व विक्री व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
कार्यक्रमास दत्तात्रय गावसाने (विभागीय कृषि सहसंचालक, पुणे विभाग), राजीव मराठे (संचालक, डाळिंब संशोधन केंद्र), लालासाहेब तांबडे (प्रमुख शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र), बसवराज रायगोंडा (प्रमुख शास्त्रज्ञ, ज्वारी संशोधन केंद्र, सोलापूर), तसेच शुक्राचार्य भोसले (जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सोलापूर), अभिजीत घेडे (कृषि उपसंचालक, सोलापूर) यांच्यासह कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.