March 31, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

बापरे… मोहोळ तहसीलदाराला अँटीकरप्शन विभागाने बजावली चौकशी नोटीस

सोलापूर: ट्रॅक्टर मालकाकडून वाफळेच्या तलाठ्याने वरिष्ठांचे नाव सांगून लाच घेतल्याप्रकरणी मोहोळच्या तहसीलदारांना एक एप्रिल रोजी चौकशीला कार्यालयात हजर राहण्याकामी अँटी करप्शन विभागाने नोटीस बजावली आहे.

 

मुरूम वाहतूक करताना पकडलेले तीन ट्रॅक्टर सोडण्यासाठी वरिष्ठांचे नाव सांगून लाच घेतल्याप्रकरणी वाफळेचे तलाठी यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी लाचखोर तलाठी सुदर्शन जाधव यांच्याविरुद्ध माढा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधि. १९८८ चे कलम ७. ७ अ प्रमाणे दाखल गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. उपरोक्त विषयान्वये मोहोळ तहसीलदारांना काढलेल्या सूचनापत्रात आरोपी सुदर्शन रमेश जाधव, (पद तलाठी, नेम, सजा वाफले, ता. मोहोळ, जि. सोलापुर, रा. विठ्ठलवाडी, ता. माढा, जि. सोलापुर) यांचेविरुद्ध माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या दाखल गुन्हयाचे तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की, यातील आरोपी तलाठी सुदर्शन रमेश जाधव यांनी तक्रारदार यांचे ट्रॅक्टरवर कारवाई न करता सोडून दिल्याने ठरलेल्या ३३,००० रुपये पैकी दि.२७ मार्च रोजी घेतलेल्या २३,००० रुपयांची कबुली देऊन, उर्वरित १०,००० रू स्वतः करीता व त्यांचे वरिष्ठांकरीता लाच मागणी केली. त्यानंतर करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडून १०,००० रु लाचेची रक्कम स्वतःकरीता व त्यांचे वरिष्ठांकरीता लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली आहे. याबाबत आपलेकडे समक्ष तपास करणे आवश्यक आहे.तरी तक्रारदार सावंत यांचे ट्रॅक्टरवर कारवाईचे अनुषंगाने आपले कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या संपूर्ण कागदपत्रांची साक्षांकित प्रतीसह आपण दि. १ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. वर नमुद गुन्हयाचे तपासकामी अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालय सोलापूर येथे उपस्थित राहवे, अशी नोटीस अँटीकरप्शन ब्युरोचे उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी मोहोळ तहसीलदारांना काढली आहे. त्यामुळे आता पुढे तपासात काय निष्पन्न होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.