सोलापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या न्यायाधीश पथकाने महानगरपालिका कॅम्प परिसरातील शाळांना भेट देऊन शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांची उपस्थिती, भौतिक सुविधा, सुरक्षितता व स्वच्छतेची सखोल पाहणी केली. कॅम्प परिसरात कार्यरत असलेल्या एकूण आठ शाळांची तपासणी करून सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना गुणवत्तावाढीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
माजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांनी कॅम्प शाळेतील वर्गांना प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला व वाचन करून घेतले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने वाचन सादर केल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, शिस्तबद्ध शालेय व्यवस्थापन आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे त्यांनी आवाहन केले.
या भेटीदरम्यान कॅम्प परिसरातील आठ शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करण्याचे आश्वासन दिले.शाळेतील भौतिक सुविधा, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, पोषण आहार, वर्गखोल्या व सुरक्षिततेची सविस्तर पाहणी करून आवश्यक सूचना देण्यात आल्या. भौतिक सुविधांबाबत मुख्याध्यापकांनी आपल्या अडचणी व समस्या पथकासमोर मांडल्या. त्या समस्यांची नोंद घेऊन आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव कादर शेख यांनी शिक्षकांशी संवाद साधताना माजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांचे उदाहरण देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळून त्याला गुणवत्ता वाढीस मदत करावी, असे त्यांनी सांगितले.
या समिती भेटीत पथकात पोलीस आयुक्त कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक अफरीन शेख, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तहसीलदार जयश्री पंचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता गायकवाड, उत्तर सोलापूर तालुक्याचे शिक्षण विस्ताराधिकारी बापूराव जमादार यावेळी उपस्थित होते.

More Stories
अभिनंदन: वारी विनावाद टेंडर, स्वच्छतागृह, जर्मन हँगरची सुविधा; क्रेडिट गोज टू कोहीणकर
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार