सोलापूर : मार्च अखेर असल्यामुळे निधी खर्च टाकण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे कामकाज मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत चालले. बिल मंजुरीसाठी ठेकेदार व संबंधित टेबलचे कर्मचारी, अधिकारी रात्री उशिरापर्यंत बसून कामकाज करीत होते. जलजीवनला मात्र एक रुपयाही निधी न आल्यामुळे नाराजीने ठेकेदार परतले.
मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी मार्च अखेर असल्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचे कामकाज सकाळी लवकर सुरू झाले. बांधकाम विभागाबरोबरच आरोग्य, महिला व बालकल्याण, कृषी, ग्रामपंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा, समाज कल्याण विभागाचा निधी खर्च पडण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची लगबग दिसून आली. जलजीवनची कोठ्यावधीचे विले प्रलंबित आहेत. त्यामुळे मार्च अखेर तरी निधी येईल या आशेने अनेक ठेकेदार जिल्हा परिषदेत ठाण मांडून होते. पण मध्यरात्रीचे बारा वाजले तरीही एक रुपया निधी आला नाही. त्यामुळे नाराजीने ठेकेदार परतले.
अखर्चित निधी गरजेच्या हेडवर वळविला जाईल, या आशेने अधिकारी ठाण मांडून होते. पण निधी आलाच नाही. बऱ्याच योजनांना मार्चअखेर फटका बसला. तरतुदीतील खात्यावर शिल्लक असलेली बिले मात्र मार्गी लागली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे हे अधिकारी त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांसह मध्यरात्रीपर्यंत कार्यालयात ठाण मांडून होते.

More Stories
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ व ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप