सोलापूर : नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्र (CIDCO Exhibition Centre) येथे २३ मार्च ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत संपन्न झालेल्या राज्यस्तरीय’महालक्ष्मी सरस प्रदर्शन २०२५-२६’ मध्ये सोलापूर जिल्ह्याने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. सोलापूरच्या केवळ १४ स्वयंसहायता समूहांनी (SHG) आपल्या दर्जेदार उत्पादनांच्या जोरावर तब्बल ९१ लाख रुपयांची विक्रमी विक्री करत संपूर्ण महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव यांनी या प्रदर्शनासाठी सोलापूर जिल्ह्याचे नियोजन केले होते. “ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्याला योग्य बाजारपेठ मिळवून देणे हा आमचा उद्देश होता आणि ९१ लाखांच्या विक्रीतून सोलापूरच्या महिलांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे,” अशा शब्दांत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी या यशाचे स्वागत केले. प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांनी सर्व १४ बचत गटांच्या प्रतिनिधींचे अभिनंदन केले आहे.
मुंबईकरांना पडली सोलापुरी स्वादाची भुरळ
१४ दिवस चाललेल्या या प्रदर्शनात सोलापूरच्या स्टॉल्सवर मुंबईकरांनी खरेदीसाठी झुंबड उडवली होती. विशेषतः खालील उत्पादनांनी मोठी उलाढाल केली:
खाद्यपदार्थ: सोलापूरची जगप्रसिद्ध कडक भाकरी, शेंगा चटणी, जवस चटणी, काळा मसाला, सांडगे आणि दही मिरची. आरोग्यदायी उत्पादने: सेंद्रिय ज्वारी, सेंद्रिय कडधान्ये, बेदाणा, हळद पावडर, शुद्ध गूळ, नाचणी व ज्वारीची बिस्किटे आणि मिलेट पापड.
फळे व मिष्टान्न: सोलापूरचे डाळिंब, पेरू आणि बोरे; तसेच खवा, पेडा, सीताफळ रबडी आणि मटका कुल्फी.
इतर: बांबू ब्रश, आवळा उत्पादने आणि खवय्यांसाठी खास नॉन-व्हेज राईस प्लेट व बिर्याणी.
महिला सक्षमीकरणाचा नवा टप्पा
प्रदर्शनाच्या सुरुवातीपासूनच (२३ मार्च) सोलापूरच्या स्टॉल्सने आघाडी घेतली होती, जी शेवटच्या दिवसापर्यंत (५ एप्रिल) कायम राहिली. केवळ १४ गटांनी ९१ लाखांचा टप्पा पार करणे ही राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी एक आदर्श कामगिरी ठरली आहे. या यशामुळे सोलापूर जिल्ह्यातील ‘उमेद’ अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या हजारो महिलांना मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. सदर यशाबाबत राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, उमेदचे राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, राज्याचे मुख्य परिचालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत ,महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे, कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी उमेद टीमचे अभिनंदन केले. सदर महालक्ष्मी सरस मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे यशस्वी नियोजन तालुका व्यवस्थापक तायप्पा करे, प्रभाग समन्वयक किशोर बिडे व प्रियांका कवडे यांनी केले
विक्री उलाढाल अहवाल
1 ) उत्कर्ष समूह अक्कलकोट 764000 रुपये
2 ) दुर्गा समूह अक्कलकोट 665100 रुपये
3 ) जिजाऊ समूह बार्शी 777800 रुपये
4 ) ओम साई समुह करमाळा 653200 रुपये
5 ) हिरकणी समूह माढा 459600 रुपये
6 ) संतकृपा समूह माढा 683800 रुपये
7 ) जस्मिन समूह माळशिरस 609200 रूपये
8 ) सई समूह मोहोळ 584760 रुपये
9 ) महालक्ष्मी समूह पंढरपूर 453600 रुपये
10 ) श्री शारदा समूह पंढरपूर 863550 रुपये
11) विठ्ठल रुक्मिणी समूह पंढरपूर 929180 रुपये
12 ) सदगुरू समूह सांगोला 466740 रुपये
13 ) तनीष्का समूह सोलापूर दक्षिण 826870 रुपये
14 ) अथर्व समूह मोहोळ 381600 रुपये
एकूण उलाढाल 9119000
या प्रदर्शनात 91 लाखाची उलाढाल झाली .महालक्ष्मी सरस मध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल जिल्ह्याचे समन्वयक किशोर बिडे यांना पुरस्कार देताना उमेदचे राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. निलेश सागर. यावेळी राज्याचे मुख्य परिचालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल उपस्थित होते.

More Stories
झेडपीचे नेहरू वस्तीगृह पाडून नवीन संकुल उभे करणार
अधीक्षक अभियंत्याची बैठकीला दांडी; पालकमंत्री जयकुमार गोरे संतापले
सोलापूर झेडपी सदस्यांना हवाय ६०/४० चा फॉर्म्युला