April 7, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

झेडपीचे नेहरू वस्तीगृह पाडून नवीन संकुल उभे करणार

सोलापूर : सोलापूर शहराच्या हार्ट ऑफ सिटीमध्ये म्हणजेच पार्क चौकात असलेले नेहरू वसतिगृहाची जीर्ण इमारत पाडून तेथे बहुमजली संकुल उभारण्याचा प्रस्ताव तयार करा अशा सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, आरोग्य व शिक्षण सभापती चेतनसिंह केदार, पक्षनेत्या रश्मी बागल यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे आदी उपस्थित होते. या बैठकीत पालकमंत्री गोरे यांनी जिल्हा परिषदेचे नूतन पदाधिकारी व सदस्यांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेत कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मान द्या. त्याचे काम होईल याकडे पहा, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वैद्य यांनी विकास कामासाठी निधी द्या अशी मागणी केली. उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी झेडपीचे उत्पन्न वाढले पाहिजे याबाबत उपाययोजना सुचवल्या. जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम विभागाचा पदभार घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मालमत्तेची माहिती घेतली आहे. सोलापूर शहर त्याचबरोबर तालुक्यात मोक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या जागा आहेत. या जागांचा विकास केल्यावर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत भर पडणार असल्याचे त्यांनी सुचवले. समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी दिव्यांग कल्याण विभागाचे कामकाज आपल्याकडे येत असल्याने माझे कार्यालय पहिल्या मजल्यावर आहे. दिव्यांग बांधवांना मला भेटण्यास येण्यासाठी त्रास होत आहे. त्यासाठी लिफ्टची सोय करावी अशी मागणी केली. आरोग्य व शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांनी सोलापूर शहरातील शाळांचा स्मार्ट स्कूलच्या धरतीवर विकास करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचे पालकमंत्री गोरे यांनी स्वागत केले. माझ्याकडे ग्रामविकास खाते असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या विकास कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली. प्रत्येक सदस्याला वर्षाला एक कोटीचा विकास निधी मिळेल. झेडपीच्या मुख्य इमारतीला तातडीने लिफ्ट बसविण्याच्या त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांना सूचना केल्या. जिल्हा परिषदेच्या सोलापूर शहरात 12 शाळा आहेत. या शाळा मोक्यांच्या जागी आहेत. यापूर्वी महापालिकेने या शाळांची मागणी केली आहे. पण जागेची किंमत मोठी असल्यामुळे महापालिकेकडे या शाळा कोणत्याही परिस्थितीत वर्ग केल्या जाणार नाहीत असे त्यांनी स्पष्टीकरण दिले. या शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी सुविधा दिल्या जातील असेही त्यांनी आश्वासन दिले.

उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सुचवलेल्या उपाययोजनावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठे भाष्य केले आहे. जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी जागांचा विकास केला जाईल पण बीओटीवर या जागा दिल्या जाणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले. पार्क चौकात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या नेहरू वस्तीगृहाची इमारत जीर्ण झाली आहे. ही इमारत पाडून बहुमजली संकुल उभारण्याचा जिल्हा परिषदेने प्रस्ताव तयार करावा व जिल्हा परिषदेच्या सर्व जागांना कुंपण बांधावे अशा सूचना त्यांनी दिल्या. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या वस्तीगृहाची दोन एकर जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. या इमारतीच्या दोन्ही बाजूला असलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना प्राधान्यक्रम देत नव्याने या इमारतीचा विकास केला जाईल असा प्रस्ताव तयार करा असेही त्यांनी सुचविल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेकडे 99 वर्षे कराराने काही जागा होत्या. पण प्रशासक काळात काही जागा परत केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याचीही चौकशी केली जाणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या प्रश्नात लक्ष घालून धडाकेबाज निर्णय घेण्याचे सुरू केल्यामुळे सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्यांबरोबर संवाद साधला. पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवावेत विकासनिधी, जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी जागेचा वापर, शाळांचा विकास यावर सकारात्मक चर्चा केली आहे. नेहरू वसतीगृहाच्या विकासावरही चर्चा झाली आहे.

इंद्रजीत पवार 

उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा परिषद