May 1, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

झेडपी सीईओंचा पीए भारी; गार्डच्या बदनामीची पुरी तयारी

सोलापूर : जिल्हा परिषदेत गुरुवारी खळबळ उडवून देणारी घटना घडली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पीएने मागील राग धरून विनाकारण बदनामी केल्याने महिला पोलीस गार्डने त्यांच्या केबिनसमोर ठिय्या मारल्यामुळे जिल्हा परिषदेत चर्चेचा विषय झाला आहे.

एकीकडे उन्हाच्या कडाक्याने लोक हैराण असतानाच जिल्हा परिषदेत गुरुवारी दुपारनंतर घडलेल्या एका घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये वातावरण तापले आहे. जिल्हा परिषदेत पूर्वीच्या गार्डने सीईओचे पीए आपली बदनामी करत आहेत, असा आरोप करत ठिय्या मारला. हा हा म्हणता ही वार्ता कर्मचाऱ्यांमध्ये पसरली. काही जण जमा झाले अन् पीएच्या कारनामाचा पाढा सुरू झाला. चालक आणि परिचर बांधवांनी झेडपीत कशी गळचेपी सुरू आहे यावर उघड भाष्य केले. याबाबत पत्रकारांनी अधिक माहिती जाणून घेतली असता धक्कादायक बाबी समोर आल्या.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पीएने यापूर्वीच्या अधिकाऱ्याकडे तक्रार करून त्या गार्डची बदली केली होती. त्यानंतर योगायोगाने पोलीस आयुक्तालयाकडून त्या गार्डच्या भावाचीच सीईओचे गार्ड म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर तत्कालीन सीईओंची बदली झाली. दुसऱ्या गार्डची शिफारस घेऊन पीएने नवीन सीईओचे कान भरले. याबाबत अधिकाऱ्यानी त्या गार्डला विचारणा केल्यावर ही गोष्ट त्याच्या मनाला लागली. आपल्यामुळे भावालाही त्रास होतोय हे लक्षात आल्यानंतर त्या गार्डने गुरुवारी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. पीएविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली. पोलीस आयुक्तांनी त्या गार्डला सीईओंची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार त्या गार्डने झेडपीत धाव घेतली. सीईओ कुशल जैन यांची त्या गार्डने सायंकाळी उशिरा भेट घेतली. सीईओ जैन घाईत असल्यामुळे त्यांनी अर्धवट कहाणी ऐकून आपण कोणताच निर्णय घेणार नसल्याचे सांगितले. या उत्तरावर समाधान न झाल्याने गार्ड अश्रू गाळतच परतल्या. याबाबत महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी पीएचे अनेक कारनामे सांगितले जे आम्ही येथे उल्लेख करू शकत नाहीत. त्या गार्डच्या तक्रारीची पोलीस प्रशासनाने दखल घेतली तर झेडपीची मोठी बदनामी होणार आहे. या प्रकरणाबाबत संबंधित पीएचेही मत जाणून घेतले असता त्यांनी आपल्याला काही माहिती नाही, असे उत्तर दिले.

झेडपी उपाध्यक्ष झाले गंभीर 

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली. पीएचा कारनामा ऐकून तेही आवक झाले. लग्नाच्या घाईत असल्यामुळे उद्या सीईओ यांच्याशी चर्चा करून यातील सत्य जाणून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सीईओ जैन हे गुरुवारी पीआरसीच्या शिफारसी दुरुस्त करण्याच्या बैठकांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही.

हलचल रजिस्टरबाबत कैफियत…

जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने मुख्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या हालचाल रजिस्टरबाबत महिला कर्मचाऱ्यांनी कैफियत मांडली आहे.