April 29, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापुरात परिमंडळ अधिकारीच करतात रेशन दुकानदाराकडून मंथली वसूल

सोलापूर: सोलापुरात रेशन दुकानदाराकडून परिमंडळ अधिकारी मंथली वसूल करतात अशी तक्रार रेशन दुकानदारांनी पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे.

जिल्हा प्रशासन पुरवठा विभागात पारदर्शकता येण्याकरिता अनेक योजना राबवित असताना मात्र अन्नधान्य वितरण कार्यालय सोलापूरअंतर्गत असलेल्या परिमंडळ अधिकारी अ विभागातील अधिकारीच रेशन दुकानदारकडून मंथली वसूल करतात असा प्रकार उघड झाला आहे. यामध्ये परिमंडळ अधिकारी नंदकिशोर डोके यांचे नाव पुढे आले आहे. ते रेशन दुकानदाराकडून जबरदस्ती मंथली वसुली करत असल्याबाबतची तक्रार आता रेशन दुकानदारांनीच केली असल्यामुळे शहर पुरवठा विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
परिमंडळ अधिकारी नंदकिशोर ढोके हे दुकानदाराकडून राजरोसपणे जबरदस्ती मंथली वसुली करत असल्याचे तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाले असल्यामुळे अ विभाग संघटनेच्यावतीने अन्नधान्य धान्य वितरण अधिकारी ओंकार पाटोळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आली. प्रशासनाच्यावतीने विनाआधार व ई केवायसी सारख्या योजनेच्या माध्यमातून अनेक कार्ड रद्द झाल्याने रेशन दुकानदारांच्या कोठ्यात कमालीची कपात झालेली असताना त्या धर्तीवर दुकानदारांचे कमिशनमध्ये कपात झाली आहे.दुकानदारांना दुकान भाडे,लाईट बिल, कामगार पगार, पेट्रोल, कौटुंबिक उदरनिर्वाहसाठी पैसे कमी पडत असताना अशा अधिकाऱ्याकडून नाहक मानसिक त्रास दिला जात असल्याने दुकानदार मेटाकुटीस आलेले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना मंथली द्यावी की घर चालवावं अशी द्विधा मनस्थिती त्यांची निर्माण झाली आहे,तरी अशा अधिकाऱ्यांवर आपल्यास्तरावर योग्य ती चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा लवकरच सोलापूर जिल्हा संघटनेच्यावतीने  जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रेशन दुकानदार संघटनेने दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी सोलापूर जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर, जिल्हा उपाध्यक्ष वहाब शेख,राजशेखर जावळे, अ झोन अध्यक्ष अभिजीत सडडो,जिल्हाप्रमुख नितीन पेंटर यांच्यासह दुकानदार उपस्थित होते. त्यामुळे आता अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे हे अश्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार याकडे सर्व दुकानदाराचे लक्ष वेधले आहे.