सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर झेडपीचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी असे काहीं केले की संतापलेले कर्मचारीही खुदकन हसले

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या विनंती बदलीपात्र कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया पुन्हा एकदा राबवा व कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या सहा कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी एकत्रितपणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची बुधवारी भेट घेऊन केली. नाराज झालेल्या कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींसह सीईओंची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागणीला न्याय देण्याची सूचना उपाध्यक्ष पवार यांनी केली. इतकेच नव्हे तर प्रतिनिधींना सीईओना निवेदन देण्यास सांगून स्वतः फोटो काढला.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेश देशपांडे, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर, राज्य सरचिटणीस राजपाल रणदिवे, अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भीमाशंकर वाले, युनियनचे जिल्हाध्यक्ष दयानंद परिचारक सचिव त्रिमूर्ती राऊत, डॉ. एस. पी. माने यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या शासन निर्णय नुसार करणे अनिवार्य आहे. 12 मे रोजी जिल्हा परिषद प्रशासनाने विविध संवर्गाच्या प्रशासकीय व विनंती बदल्या पार पाडले आहेत. या बदल्या समुपदेशनाद्वारे पार पाडत असताना प्रशासनाकडून बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तसेच यादीतील सर्व कर्मचाऱ्यांना समुपदेशनसाठी बोलवण्यात आलेले होते, परंतु यातील विनंती बदली पात्र कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे पद स्थापना देणे आवश्यक असताना विनंती पात्र कर्मचाऱ्यांना विनंती बदली पासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सर्व संवर्गाच्या कर्मचाऱ्यांमध्ये त्रिव्र नाराजी पसरलेली आहे. लिपिकवर्गीय कर्मचारी नाराज झाल्यामुळे यापुढील काळात कार्यालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करून शासन निर्णयानुसार पारदर्शकपणे बदल्या पुन्हा एकदा 15 मे पूर्वी राबविण्यात येऊन कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करावा अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची कैफियत ऐकून उपाध्यक्ष पवार यांनी तात्काळ सर्वांना सोबत घेतले. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या कार्यालयात धडक मारून त्यांचे गाऱ्हाणे सीईओना ऐकून घेण्यास सांगितले. त्यानंतर सर्व प्रतिनिधींना निवेदन देण्यास सांगून स्वतः फोटो काढला. सीईओ निवेदनावर काय निर्णय घेतील ते घेतील पण उपाध्यक्ष पवार यांनी सोक्षमोक्ष लावत केलेली कृती कर्मचाऱ्यांना भावून गेली.

यावेळी सीईओ जैन यांनी कार्यालयीन समतोल राखण्यासाठी आपल्या अधिकारात हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले, तसेच प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांना तेथे बोलवून संघटनांच्या प्रतिनिधीचे म्हणणे ऐकून घेण्यास सांगितले. यावर कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी जागेवरच सहा आपसी व सहा गरजेच्या विनंती बदल्यास पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची नावे दिली. जिल्हा परिषदेत प्रशासनाच्या निर्णयाविरोधात पहिल्यांदाच सर्व संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आल्याचे दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button