सोलापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नव्या कोऱ्या गाड्या मिळणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दीपक वैद्य, उपाध्यक्षपदी इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार, महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, कृषी व पशुसंवर्धन सभापती रामाप्पा चिवडशेट्टी यांची निवड होऊन जवळपास तीन महिन्याचा कालावधी होत आला आहे. त्याचबरोबर तालुका पंचायत समिती सभापतीपदी नवीन सभापती नियुक्त झाले आहेत. या नव्या पदाधिकाऱ्यांना गाड्या नव्हत्या. त्यामुळे गाड्या खरेदीची प्रक्रिया राबविण्यात आली. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी महिंद्रा 700 suv या गाड्या पसंत केल्या आहेत तर सभापतींना महिंद्रा स्कॉर्पिओ, बोलेरो Neo या गाड्या खरेदी करण्याची प्रोसिजर राबविण्यात आली. यानुसार नवीन गाड्यांचा ताफा जिल्हा परिषदेला उपलब्ध झाला आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे हे रविवार दिनांक 28 जून रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्याचा मुहूर्त साधत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यासह सभापतींना आलेल्या नवीन गाड्यांची पूजा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्याच हस्ते पदाधिकाऱ्यांना या गाड्यांच्या चाव्या देण्यात येणार आहेत.
अध्यक्ष बसले पहिल्यांदाच गाडीत…
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले दीपक वैद्य हे शेतकरी म्हणून ओळखले जातात. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शेतकऱ्यांची निवड झाल्याबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यापूर्वीच त्यांचे अभिनंदन केले आहे. अध्यक्ष वैद्य यांच्याकडे चार चाकी वाहन नाही. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना पूर्वीची सफारी देण्यात आली. सफारीमध्ये ते पहिल्यांदाच बसले. या गाडीतून पहिल्यांदा आपल्या गावी गेल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. आपला मुलगा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला म्हणून त्यांचे वडील जिल्हा परिषदेतील अध्यक्षाचे कार्यालय पाहण्यासाठी झेडपीत आले होते.
अध्यक्षांची सफारी जीर्ण झाल्याने अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापतींना नवीन गाड्या खरेदीचा निर्णय घेण्यात आला. उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्याकडे स्वतःच्या गाड्यांचा ताफा आहे. पण अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या गाडीबाबत सर्वांना आकर्षण आहे. अशा साध्या निष्ठावंत कार्यकर्त्याला झेडपीचा अध्यक्ष म्हणून नवीन चार चाकी मिळत असल्याने बार्शीचे नवनिर्वाचित विधानपरिषदेचे आमदार राजेंद्र राऊत हेही जिल्हा परिषदेतील कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पालकमंत्री गोरे यांच्याकडून झेडपीच्या आषाढी वारीच्या तयारीचा आढावाही घेतला जाणार आहे .

More Stories
सोलापूर झेडपीची विमा सुरक्षा कवच योजना राज्यभर राबविणार
सोलापुरात विड्या वळत महिलांनी ऐकली “मन की बात’
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते बालकाला मिळाले “दो बुंद जिंदगीके’