May 15, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर झेडपीची आज पहिली सभा; आठ कोटीची औषध खरेदी रखडणार

सोलापूर : चार वर्षाच्या प्रशासक काळानंतर निवडणुकीद्वारे पदावर विराजमान झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा 15 मे रोजी होत आहे. या सभेच्या अजेंड्यावर केवळ अकरा विषय असून आषाढी यात्रा तोंडावर असताना आठ कोटीच्या औषध खरेदीचा विषय मात्र आला नसल्याबद्दल प्रशासनाच्या निष्काळजी पणाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी होत आहे. अध्यक्ष वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या सहीने जारी केलेल्या विषय पत्रिकेत केवळ अकरा विषय मंजुरीसाठी घेण्यात आले आहेत. त्यात प्रशासकाने मार्च महिन्यात घेतलेल्या सभेतील विषयांना मंजुरी देणे, गतवर्षीचे व चालू वर्षाच्या बजेटला मंजुरी देणे, समाज कल्याण व महिला बालकल्याण विभागाकडील योजनांना मुदतवाढ खर्च व प्रस्तावन मंजुरी देणे, प्राथमिक शिक्षण विभागाचा एक विषय सभेपुढे ठेवण्यात आला आहे. आयत्या वेळच्या विषयाची यादी समोर आलेली नाही. विषय पत्रिकेत आषाढी यात्रा तोंडावर असताना आरोग्य विभागाच्या औषध खरेदीचा प्रस्ताव आला नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आषाढी यात्रा व वर्षभरातील लागणाऱ्या औषध खरेदीच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे. ही खरेदी आठ कोटीच्या पुढे असल्यामुळे आरोग्य किंवा स्थायी सभेत हा विषय घेता येत नाही. असे असताना आरोग्य विभाग या गंभीर विषयाबाबत गहाळ कसा राहिला याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी म्हणून सतीश कोपुरवाड यांनी नव्याने पदभार घेतला आहे. त्यामुळे त्यांना बऱ्याच विषयांची माहिती नाही. आल्यापासून ते आयुष्यमान कार्ड, बदल्यांच्या विषयात अडकले. आषाढी यात्रा तयारी व औषध खरेदी बाबत संबंधित कर्मचाऱ्यांनी याबाबत त्यांना वेळोवेळी माहिती देणे अपेक्षित होते. पण औषध भंडारालाही वशिल्यावर नियुक्ती झाल्याने हा मोठा घोळ समोर आला आहे. वास्तविक जिल्हा औषध भंडारासाठी अनुभवी कर्मचारी असणे अपेक्षित आहे. तत्कालीन सीईओनी अनुभवी कर्मचाऱ्यांची नियुक्तीची फाईल ठेवली आणि विभागीय आयुक्तांकडून दुसऱ्याचे नाव समोर आल्याचे आता पुढे आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे अशा चुकीचे नियुक्तीची शिफारस करणाऱ्या विभागीय आयुक्त पलकुंडवार यांचीही आता बदली झाली आहे. पण या घोळांमध्ये जिल्हा परिषदेचे प्रशासन पेचात अडकल्याचे दिसून आले आहे.

कर्मचारी आडवतात जागा…

जिल्हा परिषदेचे प्रशासन कर्मचाऱ्यांच्या सोयीवर चालल्याचे धक्कादायक वास्तव आता समोर आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन हे गेले दोन-तीन दिवस बदल्यांच्या प्रक्रियेत होते. विनंती बदलीवरून त्यांनाही कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षभरात झेडपी मुख्यालयात बदलून गेलेले सुमारे 30 कर्मचारी पुन्हा वेगळ्या मार्गाने परत आले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी जागा अडवून ठेवल्यामुळे रिक्त जागाच दाखविल्या नाहीत. पंचायत समितीकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच नाही. सामान्य कर्मचाऱ्यांवरील अन्याय खदखदत असताना अशा बाबी समोर येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना घटनेचे गांभीर्य ओळखून वेळीच पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. झेडपीच्या सदस्यांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे. नुकत्याच झलेल्या स्थायी समितीच्या सभेत आदिनाथ देशमुख यांनी आषाढी यात्रा काळात पंढरपूर परिसरातील व पालखी मार्गावरील आरोग्य केंद्रात पुरेशी कर्मचारी व ॲम्बुलन्स तयार ठेवण्याबाबत सूचना केली आहे. बऱ्याच वेळा ॲम्बुलन्स मध्ये डिझेल नसते, कर्मचारी हजर नसतात अशी गंभीर तक्रार त्यांनी केली आहे. अशात आता औषध खरेदीचा निर्माण झालेला हा पेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार कसा सोडवतात हे पाहणे आता महत्त्वाचे झाले आहे.