सोलापूर: उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी अरबी समुद्राला पोहोचले तरी महावितरण कंपनी नदीकाठच्या शेतकरी व गावांसाठी वीज कधी सुरू करणार? असा संतप्त सवाल कासेगाव चे झेडपी सदस्य व्यंकट भालके व करकंबचे सदस्य आदिनाथ देशमुख यांनी झेडपीच्या सभेत उपस्थित केल्यावर महावितरण अधिकाऱ्याची भंबेरी उडाली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. या सभेत अजंड्यावरील 12 तर आयत्या वेळच्या 20 विषयांना चर्चेअंती मंजुरी देण्यात आली. त्यात आषाढी यात्रा तोंडावर असतानाही आरोग्य विभागाने ऐनवेळी केलेल्या सेसफंडातील एक कोटी तर जिल्हा नियोजन मधून मिळणाऱ्या निधीतून दहा कोटी औषध खरेदीच्या प्रस्तावांना घाईघाईने मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेची सभा असतानाही आरोग्य विभाग आषाढी यात्रेच्या तोंडावर औषध खरेदी प्रस्तावाला मंजुरी व टेंडर काढण्याच्या विषयाला बगल दिल्याचे दिसून आले. माध्यमांन याकडे लक्ष वेधल्यावर घाई घाईने हा विषय आयत्या वेळच्या विषयात सभागृहात आणण्यात आला. त्यातही आषाढी वारीचा उल्लेख नव्हता. दुरुस्तीसह या विषयाला मान्यता देण्यात आली खरी पण ही चूक करणाऱ्यांकडे सभागृहांनी सोईस्करपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. पशुसंवर्धन केंद्रामध्ये डॉक्टर नसल्याबाबत मोठी ओरड झाली. पृथ्वीराज सावंत यांनी पुरेशे डॉक्टर नेमण्याबाबत मागणी केली. कृषीच्या योजनांसाठी निधी दुप्पट करण्याला मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळा सुधारणेवर सचिन जाधव यांनी लक्ष वेधले. जिल्हा परिषदेसमोरील आंदोलने बंद करण्यात यावीत, अशी मागणी पृथ्वीराज माने यांनी केली.
चर्चेवेळी व्यंकटराव भालके व आदिनाथ देशमुख यांनी नदीकाठच्या गावचा वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली. यावर महावितरण कंपनीचे उपअभियंता म्हेत्रे यांना समर्पक उत्तर देता आले नाही. त्यावर भालके संतापले. उजनीतून सोडलेले पाणी अरबी समुद्राला मिळाले. कलेक्टरांच्या आदेशानंतरही तुम्ही वीजपुरवठा सुरळीत करत नाही असा संताप व्यक्त केला.पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ास माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व आमदार समाधान आवताडे यांच्या विशेष अभिनंदनाचा ठराव आदिनाथ देशमुख यांनी मांडला. तसेच जिर्ण झालेल्या शाळा इमारती तात्काळ निर्लिखित करुन,नवीन इमारतीस मान्यता मिळावी, शिक्षण,आरोग्यासह इतर विभागातील रिक्त पदे तात्काळ भरावीत,शेतकरी बांधवांना जळालेले डि. पी.तात्काळ महावितरणकडून भरुन मिळावेत,कृषी विभागातील वैयक्तिक लाभ अनुदान तात्काळ वितरित करावे आधी मागण्यांकडे लक्ष वेधले. तसेच पशुवैद्यकीय अंम्बुलन्स पंढरपूर तालुक्याला मिळावी, दिव्यांगांसाठी शेळीगट व ई-बाईक योजना लाभार्थी संख्या वाढवावी,
पंढरपूर मधील बंद असलेले शालेय वस्तीगृह तात्काळ सुरु करावे अशी मागणी केली. सभेला उपाध्यक्ष इंद्रजित पवार, सभापती शिक्षण व आरोग्य समिती चेतनसिंह केदार-सावंत, सभापती कृषी व पशुसंवर्धन समिती रामप्पा चिवडशेट्टी, सभापती महिला व बालकल्याण समिती अमृता वाघे, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहीणकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, वित्त व लेख अधिकारी मिनाक्षी वाकडे, ग्रामपंचायतचे मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, महिला बालकल्ण अधिकारी प्रसाद मिरकले, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, योजना शिक्षणाधिकारी सुलभा वाटारे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी नरेंद्र खराडे यांच्यासह सदस्य व इतर अधिकारी उपस्थित होते.
पक्षनेत्या बागल यांनी केला हस्तक्षेप
सभेच्या अजेंड्यावरील व आयत्या वेळचे विषय संपल्यानंतर चर्चेवेळी सभेचे कामकाज भरकटले. उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी विकासाचे मुद्दे मांडा असे सुचवल्यावरही सदस्यांनी आपल्या मतदारसंघातील समस्या मांडण्यावर भर दिला. पहिलीच सभा असल्याने सर्वांना बोलण्यास संधी देण्यात आली. पण सभा भरकटून वेळ जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पक्षनेत्या रश्मी बागल यांनी वेळ जात असल्याबद्दल सभागृहाचे लक्ष वेधले. तरीही सदस्यांचा उत्साह थांबत नसल्याचे दिसल्यावर त्यांनी दुसऱ्यांदा हस्तक्षेप केला. शेवटी तीन तास चाललेले सभेचे कामकाज थांबविण्याचे आदेश अध्यक्ष वैद्य यांनी दिले.

More Stories
सोलापूर झेडपीची आज पहिली सभा; आठ कोटीची औषध खरेदी रखडणार
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
सोलापूर झेडपीचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी असे काहीं केले की संतापलेले कर्मचारीही खुदकन हसले