May 20, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

मंद्रूपला या दिवशी रंगणार जंगी कुस्त्यांचा फड

मंद्रूप : सिद्धेश्वर एक्सप्रेस न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच श्री सिद्धेश्वर बहुउद्देशीय सामाजिक संस्था, मंद्रूप यांच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त मंद्रूप येथे दोन दिवसीय भव्य सामाजिक, धार्मिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ मे  रोजी भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान तर दि. २६ मे  रोजी वीरशैव लिंगायत समाजासाठी लिंगदीक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दि. २५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता श्री मळसिद्धप्पा शेखासाहेब आखाडा, गाव तलाव शेजारी मंद्रूप येथे जंगी कुस्त्यांच्या मैदानास प्रारंभ होणार आहे. या मैदानात राज्यातील नामांकित मल्ल सहभागी होणार असून, प्रथम क्रमांकासाठी ३१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २१ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ११ हजार रुपयांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेमुळे तालुक्यातील कुस्तीप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या मैदानासाठी विविध स्तरांवरील कार्यकर्ते, समाजसेवक, व्यावसायिक व युवकांनी पुढाकार घेतला असून, मंद्रूप परिसरातील पारंपरिक कुस्ती संस्कृतीला चालना देण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे. गेल्या पाच वर्षांपासून सिद्धेश्वर एक्सप्रेस न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त अशा प्रकारचे भव्य कुस्ती मैदान भरविण्यात येत असून, त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

त्यानंतर दि. २६ मे रोजी सकाळी १० वाजता शिवयोगेश्वर मठ, सकळेश्वर गल्ली, मंद्रूप येथे लिंगदीक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम हत्ताळी चे श्रीपादेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते संपन्न होणार असून, वीरशैव लिंगायत समाजातील बांधवांना मोफत लिंग व पंचा देण्यात येणार आहे. धार्मिक परंपरा, संस्कार आणि समाजातील अध्यात्मिक ऐक्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.या दोन्ही कार्यक्रमांचे प्रमुख संयोजक म्हणून रेवणसिद्ध बाबुराव मेंडगुदले हे कार्यरत असून, त्यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे. सामाजिक, धार्मिक आणि क्रीडा परंपरेचा संगम असलेले हे कार्यक्रम मंद्रूप परिसरासाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.