June 7, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

मंगळवेढ्याच्या बीडीओ शेख सक्तीच्या रजेवर; करमाळ्याच्या कदम यांची वेगळीच चर्चा

सोलापूर : मंगळवेढा पंचायत समिती कार्यालयाला वारंवार दांडी मारणाऱ्या गटविकास अधिकारी जास्मिन शेख यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे तर करमाळ्याचे गटविकास अधिकारी कदम यांचीही कारकीर्द वादळी असल्याची माहिती आता समोर आली आहे.

करमाळा पंचायत समिती कार्यालयात कृषी विभागात नियुक्तीला असलेले विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे हे वरिष्ठांच्या सांगण्यावरून जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयात काम करीत असताना करमाळा पंचायत समिती कार्यालयात ते गैरहजर राहिल्याचे कारण दाखवून गटविकास अधिकारी कदम यांनी त्यांना निलंबित केले आहे. वरिष्ठांच्या सांगण्यावरून म्हेत्रे हे समाजकल्याण कार्यालयात कामकाज करीत असल्याचे माहित असताना सुद्धा कदम यांनी सीईओने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करत सुडापोटी ही कारवाई केल्याचे दिसून आले आहे. गटविकास अधिकारी कदम यांची कारकीर्द ही फारशी चांगली नाही. करमाळा पंचायत समिती कार्यालयात त्यांनीही यापूर्वी दांड्या मारल्या होत्या. लोकप्रतिनिधीच्या तक्रारीनंतर त्यांच्या कामकाजात सुधारणा झाली. त्यांनी केलेल्या चुकांवर पांघरून घालण्यात आले आहे. असे असताना कदम यांनी विस्तार अधिकाऱ्यावर पूर्वग्रह ठेवून केलेली कारवाई आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मेहेत्रे यांनी हजेरी दिलेली असतानाही जाणीवपूर्वक त्यांचा पगार अडवणे, त्यांना कार्यालयात हजर नसल्याच्या नोटिसा देणे हे गटविकास अधिकारी यांचे कृत्य सुडात्मक असल्याचे दिसून आले आहे. याबाबत वरिष्ठांनी त्यांना तोंडी कल्पना देऊनही ते रजेवर गेल्यावर कारवाई करण्याचे त्यांनी दाखवलेले धाडस सीईओंच्या आदेशांचे उल्लंघन करणारे ठरले आहे. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांना तत्कालीन सीईओ ने दिलेला अधिकार काढून घ्यावा या मागणीला जोरदार धरला आहे.

दुसरीकडे मंगळवेढ्याच्या गटविकास अधिकारी जास्मिन शेख यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. मंगळवेढा पंचायत समिती कार्यालयाला नियुक्ती असताना कामावर येत आहे असे कर्मचाऱ्यांना सांगून दिवसभर दांड्या मारल्याने लोकांची कामे खोळंबली. याबाबत आमदार समाधान आवताडे यांच्यापर्यंत तक्रारी गेल्यानंतर गटविकास अधिकारी शेख यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. शेख यांचीही आत्तापर्यंतची कार्यकीर्द वादळी ठरली आहे. उत्तर पंचायत समितीकडे नेमणुकीस असताना पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांचे अनेक वेळा खटके उडाले. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. कदम व शेख यांच्या वादळी कारकिर्दीबाबत प्रशासनाला माहिती असतानाही त्यांच्यावर आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही.

सातारा कनेक्शनचा फायदा 

गटविकास अधिकारी कदम हे साताऱ्याचे आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे ह साताऱ्याचे असल्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी काहीही केले तरी चालते असा फायदा होत असल्याची चर्चा आहे. कदम यांच्या वडिलांनी सातारा जिल्ह्यात हॉस्पिटल उभे केले आहे. हे हॉस्पिटल इतर डॉक्टर चालवतात. या हॉस्पिटलच्या देखभालीसाठी त्यांच्या कामांवर दांड्या असल्याचे बोलले जात आहे. सक्तीच्या रजेवर असलेल्या गटविकास अधिकारी जास्मिन शेख यांनी आता मुख्यालयातील पाणी व स्वच्छता विभागाची नियुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.