June 8, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

मनोज म्हेत्रे प्रकरणावर सीईओ कुशल जैन यांचा पडदा

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात अतिरिक्त कामकाज पाहणारे विस्ताराधिकारी मनोज म्हेत्रे यांच्यावर करमाळ्याचे बीडिओनी केलेल्या अन्यायकारक कारवाईत स्वतः लक्ष घालून न्याय देण्याची भूमिका पार पाडणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

करमाळा पंचायत समिती कार्यालयात नियुक्त असलेले व गेले काही महिने जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात वरिष्ठांच्या सूचनेवरून कामकाज पाहणारे विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे यांना करमाळ्याचे बीडीओ कदम यांनी कार्यालयात गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत सीईओने दिलेल्या अधिकारात निलंबनाची कारवाई केली होती. समाजकल्याण कार्यालयात कामकाज पाहूनही विस्तार अधिकारी म्हेत्रे यांच्यावर कारवाई झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अधिकाऱ्यांच्या वादातून कर्मचाऱ्याला लक्ष करण्यात आल्याची चर्चा या प्रकरणानंतर सुरू झाली. समाजकल्याण विभागाच्या सभापती संस्कृती सातपुते यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पत्रकारांशी संवाद साधताना यापूर्वीच्या सीईओनी अधिकाराचे विकेंद्रीकरण करीत कामाचा भार कमी करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेले अधिकार कायम ठेवणार असल्याचे सांगितले. पण चुकीची कारवाई झाल्यास आपल्याकडून ही कारवाई रद्द करण्यात येईल. माझ्याकडे न्याय मागण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार आहे. म्हेत्रे यांच्या प्रकरणात काय काय घडले याबाबत चौकशी करून न्याय दिला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता आहे. आषाढी वारी तोंडावर आहे. त्यामुळे वारीच्या कामावर भर दिला आहे. प्रशासन विभागाचा प्रमुख मी आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामकाजात गती आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

आषाढीच्या खर्चाला परवानगी…

आषाढी यात्रेच्या सोयी सुविधांसाठी वीस कोटीचा निधी मंजूर झाला आहे. पालखी मार्गावरील सुविधांसाठी आवश्यक असलेले टेंडर काढणे व त्याला मंजुरी देण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता या कामांना गती देणार असल्याचेही सीईओ जैन यांनी सांगितले.

अध्यक्षांनी व्यक्त केला संताप 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी प्रशासनावर सोमवारी संताप व्यक्त केला. जिल्हा परिषदेत सोमवारी नो व्हेईकल डे पाळला जातो. त्यामुळे जिल्ह्यातून येणारे सदस्य वाहनाअभावी प्रवास टाळतात. अशात प्रशासनाने सोमवारी जलव्यवस्थापन समितीची सभा ठेवली होती. सदस्य न आल्याने अध्यक्ष वैद्य संतापले. कोणाला विचारून सभा ठेवली असा त्यांनी सवाल उपस्थित केला. आचारसंहिता असल्याने काहीही महत्त्वाचे विषय सभेसमोर नव्हते असे त्यांनी सांगितले.